Sunday, December 22, 2019

अर्थशक्ति देवदुर्ग पुढचं पाऊल


अर्थशक्ति

‘अर्थशक्ति’चा संपूर्ण दिवाळी अंक अर्थविषयक विषयांना वाहिलेला आहे. ‘भारतीय राष्ट्रीयकृत बँकांची दयनीय स्थिती’ या विषयावरील डॉ. अनंत लाभसेटवार यांचा लेख अभ्यासपूर्ण आहे. देशातील 27 टक्के बँका आजारी असून देशातील आर्थिक उलाढालीचा 70 टक्के हिस्सा त्यांच्याकडे आहे. बुडित कर्जाचे प्रमाण वाढल्याने या बँका धोक्यात आल्या आहेत. सरकार मागे उभे असल्याने त्या तरल्या आहेत. सरकारी हस्तक्षेप व चुकीच्या धोरणांमुळे बँकांची ही अवस्था झाली आहे. ‘नोटाबंदी आणि अंमलबजावणी’ या राजीव जोशी यांच्या लेखात नोटाबंदीची कारणमीमांसा केली आहे. ‘बँकिंग व्यवहार व जोखीम’ या लेखात बँकिंग क्षेत्रातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचा उहापोह केला आहे. बँकिंग व डिजिटलायझेशन, बँकांचे कर्जवितरण, बँक खात्यावर व्यावहारिक स्थायी सूचना आदी लेख माहितीपूर्ण आहेत. वस्तू व सेवा करप्रणाली, स्ट्रेस मॅनेजमेंट, आयुर्विमा पॉलिसी, आयुर्विम्याचे पर्याय, शेअर्सची निवड व बाजारावर परिणाम करणारे घटक आदी लेख माहितीपूर्ण आहेत.
अर्थशक्ती

संपादक – रमेश नार्वेकर
मूल्य – 75 रुपये




 देवदुर्ग                                          

देवदुर्ग हा दिवाळी अंक विविध विषयांवरील लेखाने नटलेला आहे. ‘खरंच : तो आला होता’, ‘कालाय तस्मै नम:’, ‘आजचे विद्यार्थी जीवन’, ‘एका साळुंखीचे पिल्लू’, ‘परात्पर गुरू डॉ. आठवले यांच्यात ऋषीप्रमाणे जाणवणारी वैशिष्ट्येे’, ‘आळस कार्यभाग नासतो’, ‘केवळ निमित्त मात्र’, ‘अनुभूती’, ‘आचर्‍यातील पारंपरिक श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव’, ‘कागदविरहीत कार्यालय’ आदी लेख वाचनीय आहेत.
देवदुर्ग

संपादक – आनंद लोके
मूल्य – 100 रुपये




पुढचं पाऊ


‘पुढचं पाऊल’ हा दिवाळी अंक हिमालयाला वाहिलेला आहे. ‘नगाधिराज हिमालय’ हा डॉ. स्नेहलता देशमुख यांचा लेख वाचनीय व माहितीपूर्ण आहे. ‘अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अमुची आशा’ या लेखात सियाचिनवरील अत्यंत बिकट परिस्थितीची माहिती देण्यात आली आहे. काश्मिरी तरुणांना चांगल्या मार्गावर नेणार्‍या ‘असीम एक ध्यास’ हा खास लेख आहे. असीम फाऊंडेशनतर्फे काश्मिरी तरुणांना मदत करण्यात येते. याची माहिती या लेखात दिली आहे. ‘जावे उंच परी आरोग्याची जपावे’ हा डॉ. नीलम रेडकर व डॉ. गणेश शिंदे यांचा विशेष लेख आहे. अतिउंचावरील गिर्यारोहण करण्यापूर्वी शरीरात होणार्‍या बदलाची माहिती व त्यापासूनच्या उपाययोजनांची माहिती देणे गरजेचे आहे. ‘हिमालय की गोद मे’ या दिलीप ठाकूर यांच्या लेखात हिमालय क्षेत्रात चित्रपटांच्या शुटिंगची माहिती देण्यात आली आहे. ‘टूर्स फें्रड ऑफ लडाख’ हा आत्माराम परब यांचा लेख लडाखविषयी माहिती देणारा आहे. ‘सह्यगिरी भेट हिमालयाला’ हा प्रज्ञा पोवळे यांचा लेख रामदास स्वामींवर लिहिलेला आहे. ‘बर्थ डे पार्टी’, ‘अश्‍वत्थामाची आई’, ‘अर्जुना अंगात आला’ आदी लेख वाचनीय आहेत.
पुढचं पाऊल

संपादक – ऋतुजा पोवळे
मूल्य – 80 रुपये