धनंजय
शतकी परंपरा असणा-या दिवाळी अंकांच्या
साहित्यप्रकारात अर्धशतकाहून अधिक काळ लक्षणीय योगदान देणारा धनंजय हा
दिवाळी अंक यंदाही भयगूढ, विज्ञान, रहस्य, युद्ध, शोध, साहस अशा नानाविध
कथांचा नजराणा घेऊन वाचकांसमोर हजर झाला आहे. ‘धनंजयकारांच्या
स्मृतीनिमित्त’ हा विशेष लेख यंदाच्या धनंजयचे मुख्य आकर्षण आहे. धनंजयचे
माजी संपादक दिवंगत राजेंद्र कुलकर्णी यांच्याबद्दलच्या आठवणी सांगणारा लेख
राम देशमुख यांनी लिहिला आहे. ‘भिंतींना जिभाही असतात’ या विज्ञानकथेत डॉ.
बाळ फोंडके यांनी गुन्हेगारांचा शोध लावण्यासाठी एका अनोख्या शक्यतेचा वेध
घेतला आहे. माणसांना खूळ लावणारं झाड असू शकतं का? त्याची बुद्धिमत्ता,
प्रतिभा झाड शोषून घेऊ शकतं का? या अनोख्या कल्पनांचा विस्तार करून माधुरी
तळवलकर यांनी लिहिलेली ‘बुद्धिवृक्ष’ ही गूढकथा वाचकांना विचार करायला भाग
पाडेल. एका लढाईची रोमहर्षक साहसकथा कर्नल जयसिंह पेंडसे यांनी सांगितली
आहे. सखी बलसावर यांनी त्यांचं संशोधन पूर्णत्वाला नेण्यासाठी कशाप्रकारे
सर्वस्व पणाला लावून संशोधन पूर्ण केलं हे ‘सूर्यसूक्त’ या विज्ञानकथेतून
अरुण हेबळेकर यांनी सांगितलं आहे. भयगूढ कथांमध्ये शैलेंद्र शिर्के यांची
‘काजळमाया’, जयश्री कुलकर्णी यांची ‘रखवालदार’ या कथांचा समावेश आहे.
गूढकथांमध्ये सागर कुलकर्णी यांची ‘नैनं दहती पावक:’, शरद दळवी यांची
‘मृत्यूपत्राचे गूढ’ या कथांचा समावेश आहे. एकुणातच पन्नास दर्जेदार कथा
आणि चार माहितीपूर्ण लेख असा भरगच्च बौद्धिक फराळ वाचकांना या अंकातून
मिळणार आहे.
संपादक : नीलिमा राजेंद्र कुलकर्णी
पाने : ३९२
किंमत : २०० रुपये
पाने : ३९२
किंमत : २०० रुपये
आपला डॉक्टर
वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित विषय घेऊन
त्याद्वारे वेगवेगळे आजार, त्याविषयीची अभ्यासपूर्ण माहिती व त्यावरील उपाय
‘आपला डॉक्टर’ या अंकात तज्ज्ञ डॉक्टर मांडत असतात. या वर्षीचा विशेषांक
‘संधिवात आणि अस्थिरोग’ या मुख्य विषयाशी निगडित आहे. यामध्ये ‘सांध्यांचे
आजार का व कसे होतात?’ हा डॉ. व्ही. आर. जोशी यांचा तसेच ‘पाठीचा कणा –
रचना आणि कार्य’ हा डॉ. अभय नेने यांचा तर ‘नेहमी आढळणारे सांध्यांचे
विकार’ हा डॉ. एस. एम. हर्डिकर आणि डॉ. मदन हर्डिकर यांचे लेख खूपच
माहितीपूर्ण आहेत. लहान मुलांनाही संधिवात होऊ शकतो, हे सांगणारा डॉ.
गुरमित मंगत यांचा ‘लहान मुलांचा संधिवात’ हा लेख खरोखरच विचार करायला भाग
पाडणारा आहे. डॉ. अश्विनी गांधी यांनी स्त्रियांसाठी प्रबोधनकर असा
‘ऋतुनिवृत्ती आणि ऑस्टिओपोरॉसिस’ हा लेख महिला वाचकांनी आवर्जून
वाचण्यासारखा आहे. शाम रानडे यांच्या ‘सांधेदुखी प्रतिबंधक आहार’ या
लेखातून सांधेदुखी प्रतिबंधक आहार कसा असावा, याचं महत्त्व स्पष्ट केलं
आहे. तर ‘हाडांचे आरोग्य आणि आहार’ या लेखातून डॉ. शीतल म्हामुणकर यांनी
हाडांचं आरोग्य दीर्घकाळ टिकवण्यासाठी आहार कशाप्रकारचा असायला हवा, हे
अधोरेखित केलं आहे. संधिवातावर कोणकोणते आयुर्वेदिय उपचार करता येतील, हे
डॉ. ऊर्मिला थत्ते आणि डॉ. सुप्रिया भालेराव यांच्या लेखातून कळतं.
संपादक : शीतल मोरे
पाने : १०४
किंमत : ८० रुपये
पाने : १०४
किंमत : ८० रुपये
असाही महाराष्ट्र
विविध जाती-धर्मातील दिवाळी, जात
पंचायतींचा कहर तर आता तिस-या वर्षी विज्ञान, सामाजिक, विशेष लेख आणि
व्यक्तिविशेष असे चार विषयांचे एकत्रित मिश्रण असलेला हा दिवाळी अंक आहे.
विज्ञानवाटा विभागात मराठी विज्ञान परिषदेची ओळख (प्रदीप म्हात्रे),
खेळण्यांचा जादूगर अरविंद गुप्ता यांच्यावरील लेख (शोभा भागवत), अरण्यानंद
(हर्षल लोहकरे), परभणीच्या पालम तालुक्यातील केरवाडीमधील सामाजिक, आर्थिक
विकास साधणारी एसईडीटी ही सामाजिक संस्था (मोतीराम पोळ) आणि महिलांना गणित
समजत नाही, या गैरसमजावर प्रहार करणारा किशोर दरक यांचा लेख उल्लेखनीय आहे.
समाजभान या विभागात विविध समाजोपयोगी कार्य करणा-या संस्था, प्रकल्प,
उपक्रम आणि व्यक्ती यांची माहिती दिली आहे. विशेष आणि विविध विभागात पैसा,
माध्यमं आणि राजकारण यावर ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांचा लेख आहे.
विद्यार्थी, शिक्षक तसेच माध्यम आणि प्रशासनात असलेल्या प्रत्येकाने
वाचावा, असा हा अप्रतीम लेख आहे. व्यक्तिवेध विभागात लहान भूमिकांमधून मोठी
मजल मारणाऱ्या चित्रपट कलावंत नवाजुद्दीन याचा प्रवास आहे. त्याचबरोबर
नाथपंथी डवरी गोसावी समाजातील रामचंद्र भोसले यांची जीवनकथा, महिला शाहीर
अनसुयाबाई शिंदे, झाडे लावण्यासाठी प्रोत्साहन देणा-या संध्या चौगुले आणि
स्वातंत्र्यसैनिक डॉ. टोणगावकर यांच्या समर्पित जीवनाबद्दल माहिती मिळते.
संपादक मंडळ : अमोल गवळी आणि अन्य मान्यवर
पाने : २००
किंमत : १५० रुपये