उल्हास प्रभात
जीवनात विविध पातळय़ांवर संघर्ष करणा-या प्रत्येकाला अंधारातून उजेडाकडे
नेणारी दिवाळी. विचारांचा उजेड देऊन समृद्ध जीवन करणारी दिवाळी, असेच
दीपावलीचे वर्णन करता येईल. हाच प्रकाशमय विचार घेऊन आगळय़ा साहित्यसंपदेचा
फराळ वाचकांसाठी ‘उल्हास प्रभात’ घेऊन आला आहे. मुले जन्माला आली की,
प्रत्येक आई-वडील आपापल्या मुलांवर आपापल्या परीने संस्कार करण्याचे
प्रयत्न करतात. याच संस्काराविषयी ‘मुलांवरील संस्कार’ या सातवीतील
विद्यार्थ्यांने मांडलेला विचार बरंच काही सांगून जातो. स्त्री-पुरुष
समानता कितीही मानत असली तरी समानता नाहीच. हे ठासून सांगणारा ‘आजच्या
काळाची स्त्रियांची स्थिती’ हा लेख आजही अंधारात चाचपडणा-यांच्या डोळय़ांत
अंजन घालणारा आहे. समाजातील अपंगांचा प्रश्न, सुंदर कोकण, आयुष्याचे घडय़ाळ,
सकारात्मकतेचे जीवन आदी विषयांना केलेला स्पर्श वाचकांसाठी नवीन दिवाळी
पहाट आहे.संपादक : गुरुनाथ बनोटे,
पाने : ११७, मूल्य : ७० रुपये
चंद्रकांत
चार संपूर्ण कादंब-या, चौकटी, कादंबरीच्या बदलत्या स्वरूपाबद्दल मीमांसा करणारे विशेष लेख असा फराळ वाचकप्रिय चंद्रकांतच्या यंदाच्या दिवाळी अंकात आहे. भालचंद्र देशपांडे, अरुण हेबळेकर, माधुरी तळवलकर आणि विभूती नारायण राय यांची चंद्रकांत भोंजाळ यांनी अनुवादित केलेली कादंबरी अशा चार कादंब-या या अंकात आहेत. बाबू मोशाय यांचा ललिता पवार यांच्यावरील परिचयात्मक लेख या अंकात आहेत.
संपादक : नीलिमा राजेंद्र कुलकर्णी
अतिथी संपादक : मनोज आचार्य,
पृष्ठे : २१९, मूल्य: १७५ रुपये
महानगरी वार्ताहर
वैचारिक लेख, प्रहसन, विनोदी कथा, प्रासंगिक लेख, रहस्यकथा, अनुवादित
कथा, कविता अशा दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण साहित्याने अंक नटला आहे.
निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तारेय शेकटकर यांचा ‘दहशतवाद्यांचे टार्गेट
मुंबई’ तसेच डॉ. प्रमोद पाठक यांचा ‘मुस्लीम समाजाकडून धर्मसंबंधातील
अपेक्षा’ हे संरक्षण आणि मुस्लीम समाजाला विचार करू लावणारे लेख आहेत.
त्याचबरोबर भा. ल. महाबळ यांची ‘कळा या लागल्या देहा’ ही विनोदी कथा, दिलीप
ठाकूर यांचा ‘सिनेसृष्टीचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध’ आणि वसंत जोशी
यांचा ‘हीरक महोत्सव गीत रामायणाचा’ हे लेख अतिशय वाचनीय झाले आहेत.कार्यकारी संपादक : शरद मेस्त्री,
पाने : २१० किंमत : १०० रुपये
दर्याचा राजा
कथा, कविता आणि लेख यांनी भरपूर असा हा अंक आहे. शिवाय, आरोग्य, सिनेमा,
क्रीडा, नाटक, भक्तिपर लेखही अंकात आहेत. ज्योतिषाविषयीही एक विशेष लेख
असून मासळी आणि मत्स्योत्पादनाविषयी मार्गदर्शनपर लेख अंकात आहेत.संपादक : पंढरीनाथ तामोरे,
पृष्ठे : २०० मूल्य : ५० रुपये
आश्लेषा
मुखपृष्ठापासून लक्षवेधी अंकांमध्ये या अंकाचीही गणना करावी लागेल. कथा,
अनुवादित कथा, मुलाखती, लेख, सिनेमा, साहित्य, संगीत, नाटक, मराठी कथा,
माहिती युग यांच्या अनुषंगाने बदलत्या परंपरांचा वेध घेणा-या लेखांचा
विभाग, कविता, व्यंगचित्रं असं भरपूर साहित्य या अंकात समाविष्ट आहे.
सत्यजित राय यांची अनुवादित कथा, केनिया पर्यटनाची माहिती देणारा लेख,
ग्रंथालीची त्रिमूर्ती हा विशेष लेख, व्यवसायाविषयी बोलते झालेले नामवंत
याचबरोबर राशीभविष्यही अंकात देण्यात आले आहे.संपादक : अशोक तावडे, कार्यकारी संपादक : अजित आचार्य,
पृष्ठे : २१६, मूल्य : ११०
आपल्याला नेहमीच काळजी वाटते, असा विषय म्हणजे देशाची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था! एखाद्या अनोळखी, परंतु जीवघेण्या आजाराची साथ एखाद्या अचानक आलेल्या वादळसारखीच असते. अशी अनेक वादळं आज आपल्या आरोग्याची वाट लावत आहेत. या सगळय़ाची लक्षणं मात्र आपल्याला आपल्या बिघडलेल्या जीवनशैलीतच सापडतील. आज चाळिशीनंतर होणारे आजार आपल्या पिढीत २५-३०शीतच दिसू लागले आहेत. या रोगांना समर्थपणे तोंड देण्यासाठी आपल्याला युद्ध पातळीवर काही करावे लागेल. पण नेमके काय करावे लागेल.. याचच धांडोळा ‘आरोग्य ज्ञानेश्वरी’ या दिवाळी अंकातून घेण्यात आला आहे. ‘क्रीडा वैद्यक’, ‘कृष्ण कथा’तून मुलांवर संस्कार घडवण्याचा प्रयत्न आहे. मुलांचे अभ्यासाकडे नेहमीच दुर्लक्ष होते, मात्र अशा मुलांना ‘कमी वेळात जास्त अभ्यास करायची जादू’ या अंकात सापडेल. जीवनात यश मिळवायचे तर सशक्त मन हवे आणि हे मन तयार करायचे तर या अंकातील ‘यशस्वी व्हा’सारखा मंत्र नाही. सोबतच ‘मधुमेह’, ‘मधुमेह आणि स्त्री’ ‘मधुमेहात पायांची घ्यायची काळजी’, ‘अन्न विषबाधा’, ‘लठ्ठपणा’ आणि दातांविषयी सर्व काही देण्याचा या अंकाचा प्रयत्न आहे.
संपादक : डॉ. हेमंत जोशी
पाने : १६०, मूल्य : १२० रुपये
आधुनिक जगाबरोबरच बाजारही बदलले आहेत. रस्त्यावर मिळणारा कांदा-बटाटा आता गारेगार मॉलमध्ये मिळू लागला आहे. मॉलमध्ये खरेदी करणे आता गरजेपेक्षाही ‘स्टेटस सिम्बॉल’ बनले आहे. तरीही घराजवळच्या बाजाराचे महत्त्व कमी झालेले नाही. बाजाराचा विविधांगी अभ्यास करणारा ‘पुढचं पाऊल’चा दिवाळी अंक अत्यंत विशेष आहे. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांनी ‘बाजार’ या विषयावरील लेखात मॉलपेक्षा नेहमीच्या दुकानदारांकडे घेणे किती योग्य असते याची माहिती दिली आहे. ‘बाजार जगण्याचा.. पाहण्याचा आणि गावोगावचा ! !’ या लेखात सध्याच्या मार्केटिंगच्या पद्धतीची तपशीलवार माहिती दिली आहे. गरजेच्या वस्तूंपेक्षा अशा ‘पाहून प्रेमात पडून खरेदी केलेल्या’ वस्तूंची उलाढाल जास्त आहे. ‘सिनेमाच्या बाजारा’चे मार्केट झाले.. या दिलीप ठाकूर यांच्या लेखात चित्रपटसृष्टीच्या बाजाराचे गणित मांडले आहे. ‘तमाशाचा बाजार’ या लेखात बदलत्या अर्थकरणानुसार आपलं रूप बदललं आहे. पारंपरिक कलेकडून तो आधुनिक बनला आहे. ठिकाण बदलली तरी लावणीची श्रंगारिक नशा मात्र तशीच राहिली. मात्र तमाशातील कला मात्र मरत गेली. ‘कवितेचा बाजार’ या लेखात प्राध्यापक विसूभाऊ बापट यांनी कवितांच्या बाजाराची माहिती दिली आहे. ‘जाहिरातीतून मांडला जाणारा ‘स्त्री देहाचा’ बाजार या लेखात जाहिरातीतील स्त्रियांचे दर्शन घडवले आहे. या लेखांबरोबरच ‘शिक्षणाचा बाजार’, ‘नशेचा बाजार’, ‘वैद्यक क्षेत्रातील बाजार’ ‘आडनावांचा बाजार’, ‘लग्नाचा बाजार’ आदी लेख वाचनीय आहेत. त्याचबरोबर व्यंगचित्र, आठवडे बाजार, कथा, कविता आदींनी हा अंक सजला आहे.
संपादक : ऋतुजा (क्षमा) रा. पोवळे
पाने : १७६, मूल्य : ८० रुपये
कथा स्पर्धेची आपली परंपरा सांभाळत ‘आनंदाचा सोहळा’चा दहा दिवाळी अंक बाजारात आला आहे. नवोदितांना प्रोत्साहान देण्यासाठी नव्या लेखाकांच्या कथांना स्थान देत असतानाच प्रतिथयश लेखकांचे साहित्यही यात समाविष्ट करण्यात आले आहे. शशिकांत काळे, नि. श. गुळवणी, अरविंद कटकधोंड, राकेश खेडकर यांच्या साहित्याने अंक सजला आहे. छोटय़ा पडद्यावरील दिवाळी हा संजय घावरे यांचा लेख उत्तम जमला आहे. त्याशिवाय ह.भ. प. दादा महाराज मोरे आणि एकंदरच मोरेमाऊली समाजाच्या कार्याची ओळख करून देणारा ह.भ.प. जगदीश सिंह यांचा तसेच गायनाचार्य ह.भ.प. हरीभाऊ महाराज िरगे यांच्या कार्याची ओळख करून देणारा शामसुंदर सोन्नर यांचा लेख या अंकाचे अध्यात्मिक मूल्य जपणारा आहे. प्रदीप म्हापसेकर यांच्या रेखाचित्रांनी अंकाची शोभा अधिकच वाढवली आहे. त्याशिवाय वात्रटिका, काव्य सोहळा ही मनोरंजानची मेजवाणी आहेच.
संपादिका : जान्हवी घावरे
पाने : १२४, मूल्य : १००
कृ. ल. मानकर यांचा टॉनिक या नागरिक शास्त्र विशेषांक छोटय़ा दोस्तांना ख-या अर्थाने ‘टॉनिक’ देणारा आहे. समाजात, सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे, वावरावे याचे ‘टॉनिक’ या अंकाच्या माध्यमातून सहज मिळू शकेल. विद्यार्थ्यांना मूल्य शिक्षणही देण्याचा अनोखा प्रयोगही अंकात करण्यात आला आहे. तसेच डॉ. विजया वाड, शिरिष पै, भा.ल. महाबळ, सिंधुताई सपकाळ, डॉ. माधवी वैद्य, निशिगंधा वाड, प्रा. अरविंद दोडे, विठ्ठल कामत, विजयराज बोधनकर, यशवंतराव गडाख, अनिता पाध्ये अशा अनेक ज्येष्ठ मान्यवरांच्या ५९ कथा, कवितांचा अंकात समावेश आहे. शिवाय जयवंत काकडे यांची चिमटे काढणारी व्यंगचित्रे, विनोद, सुविचार आहेच. थोडक्यात विद्यार्थ्यांना साहित्याची गोडी लागून त्यांना साहित्याच्या विविध अंगांची ओळख होण्यास हा अंक उपयुक्त निश्चित उपयुक्त ठरेल.
संपादक : कृ. ल. मानकर
पाने : २००, मूल्य : १०० रुपये