Showing posts with label त्रिकाल निर्भय राज्य शतायुषी दर्यावर्दी. Show all posts
Showing posts with label त्रिकाल निर्भय राज्य शतायुषी दर्यावर्दी. Show all posts

Monday, November 23, 2015

स्वागत दिवाळी अंकांचे 9

दर्यावर्दी
दिवाळी अंक ही मराठीतील साहित्यिक मेजवानी आहे. बदलत्या युगात संगणकीय व इंटरनेटच्या माध्यमातून आजची तरुण पिढी दिवाळी अंकाच्या वाचनाकडे वळत आहे. ‘कोकणी दर्यावदी’ या लेखात कोकणातील दर्यावदींची माहिती दिली आहे. कोकणातील दर्यावदी हे चैतन्यशील व काटक असतात. ७० ते ८० वर्षापूर्वी शिक्षणात मागे असलेला दर्यावदी समाज आता शिकू लागला आहे. हे कुशल व धाडसी असून रात्रंदिवस मत्स्य व्यवसायाचा कर्मयोग जपणे हाच त्यांचा स्थायीभाव असेल. या दर्यावदींच्या महिलाही शिक्षण नसतानाही व्यवहार ज्ञानाच्या कौशल्यावर मत्स्य व्यवसायाचे अर्थशास्त्र पेलताना दिसतात. ‘बर्फाळलेल्या समुद्रातील तुरुंग’ हा लेखही अंगावर काटा आणणारा आहे. ‘मदतीसाठी हाक’ हा विलास फडके, ‘गौरी’ अरुणकुमार यादव, ‘जीवनाधार’ अ. के. देशपांडे, ‘अभागी’ सुधीर पाटील यांचे लेखही वाचनीय बनले आहेत. ‘कोकणातील – कॅलिफोर्निया’ श्रीवर्धन या लेखामध्ये या गावाचे वर्णन केले आहे. श्रीवर्धन गावात बाळाजी विश्वनाथांच्या मूळ वास्तूच्या चौथ-यावर पेशव्यांचे स्मारक उभे आहे. तसेच श्रीवर्धनपासून १६ किलोमीटरवर दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे हरिहरेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे. या गावालाही विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. नारळ, सुपारी, केळीच्या बागांनी श्रीवर्धनचे वैभव राखले आहे. ‘अनाथांचा नाथ-गोपीनाथ’ हा पांडुरंग भाबल यांचा मुंडेंवरील लेख वाचनीय व माहितीप्रदान आहे. मुंडे यांच्यात समयसूचकता आणि निर्णयक्षमता प्रचंड होती. ग्रामीण व शहरी जीवनाचा समन्वय साधत आपल्या भूमिका ते नेत्यांचा गळी उतरवण्यात कमालीचे यशस्वी ठरले. ‘कोळी समाजाचे ‘गोत्र’ हे ‘वाल्मिकी’ होय ! हे नि. ह. रेवंद यांचा लेख माहितीप्रदान व वाचनीय आहे. कोळी समाज हा धार्मिक असून देवभोळा स्वभावाचा आहे. कोळी समाजाचा आद्य पुरुष हा गुरु वाल्मिकी हे कोळी होते. त्यामुळे कोळी समाजातील लोकांनी आपले गोत्र ‘वाल्मिकी’ हे जाहीर करावेत. ‘अमेरिकेतील वीकएंड’, ‘ताडोबाच्या जंगलात’ ‘समाज जीवनातील अंतरंग’ आदी लेखही वाचनीय आहेत.
संपादक :अमोल सरतांडेल
पाने : ११२
किंमत : ६० रु.

शतायुषी
सर्वसामान्यांमध्ये आरोग्याबाबत जागृती निर्माण करणारा ‘शतायुषी’चा आरोग्य विशेषांक आहे. यंदाच्या दिवाळी अंकात ‘शाळकरी मुलामुलींचे आजार, आरोग्य आणि अभ्यास’ या विषयाचे महत्त्वपूर्ण पैलू उलगडणारा एक विशेष विभाग आहे. या विषयांतर्गत शाळकरी मुलामुलींचे गंभीर आजार, मुलींचे विशेष आजार, ‘सेक्स एज्युकेशन’ची गरज, सुदृढ राहण्यासाठी मुलांचा आहार कसा असावा, मुलामुलींच्या वर्तवणूक समस्या, मुलं बिघडू नयेत यासाठी काय-काय करता येईल, मुलांच्या अभ्यासाच्या सवयी आणि कौशल्ये, आपल्या पाल्याचा सर्वागीण विकास कसा करता येईल, अशा अनेक विषयांची माहिती देशातील नामवंत डॉक्टरांच्या लिखाणातून मांडली आहे. ‘आजार आणि आरोग्य – एक मुक्त संवाद’ या विभागातील लेखमालेअंतर्गत मूल न होणा-या स्त्रियांसाठी ‘डॉक्टर मला बाळ हवंय!’ हा डॉ. अरविंद संगमनेरकर यांचा ‘ओव्ह्युलेशन स्टडी’वरील लेख मार्गदर्शनपर आहे. ‘डॉक्टरी सत्यकथा – दृष्टांत’ आणि ‘डॉक्टरी सत्यकथा – बिरादरी’ हे अनुक्रमे डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांचे लेख विशेष वाचनीय आहेत. भामरागडमधलं आदिवासींचं जीवन, त्यांना उद्भवणा-या आरोग्याबाबतच्या समस्या आणि या डॉक्टर दाम्पत्याला उपचार करताना आलेले थरारक अनुभव त्यांनी आपापल्या लेखांतून मांडले आहेत. डॉ. सुधांशू पटवारी यांचा ‘कॉँस्टिपेशन – एक अवघड दुखणं’ हा लेख, डॉ. राजीव सोमण यांचा ‘व्हायरस आणि व्हायरल इन्फेक्शनमुळे होणारे आजार’, डॉ. अरविंद कोठे यांचा ‘जुनाट सर्दी-पडसं आणि होमिओपॅथिक उपचार’ हे लेखही माहितीपूर्ण आहेत.
संपादक : डॉ. अरविंद संगमनेरकर आणि डॉ. सौ. आशा संगमनेरकर
पृष्ठ संख्या : २२६
किंमत : रु. १२०/-

निर्भय राज्य
विविध कथा, लेख, अध्यात्माचा वेध, अर्थकारण, राजकारण, परीक्षण, नवे विचार आणि संकल्पनांनी सजलेला या वर्षीचा ‘निर्भय राज्य’ हा दिवाळी अंक वाचकांना विविध विषयांच्या माध्यमातून वास्तवाची ओळख पटवून नाविन्याच्या उंबरठय़ावर नेऊन ठेवणारा ठरतो. दिवाळी बरोबरच भविष्यातील महाराष्ट्र, स्त्रियांवरील अत्याचाराचा मागोवा घेऊन अंतर्मुख करणा-या घटना, एक पुरोगामी पाऊल, शिक्षणातली नवी क्रांती, डॉ. नरेंद्र दाभोलकर कृतीशील विचारवंत आदी लेखांचा सामावेश या अंकात महत्तवपूर्ण करण्यात आला आहे. माळीण गावातील निसर्ग तांडव वाचकांसमोर उभे करून भविष्यातील परिणामांचा वेध घेऊन समाजाला जागृत करण्याचा एक प्रयत्न करण्यात आला आहे. त्याचबरोबर सौंदर्य, मुलाखत, जागतिक व्यापार, शिक्षण, दैवगती, पुरोगामी पाऊल यासारख्या लेखांनाही या अंकामध्ये विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. वाचकांनी हा अंक जरूर वाचावा.
संपादक : शशिकांत कावले
पृष्ठे : १२०
मूल्य : १०० रुपये

त्रिकाल
‘त्रिकाल’या महिला विशेष दिपावली अंकात राजकारणापासून अगदी पोळी-भाजी केंद्रापर्यंत विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणा-या कर्तुत्ववान महिलांचे लेख समाविष्ट करण्यात आले आहेत. यामध्ये लोकसभ अध्यक्ष सुमित्रा महाजन, गायिका देवकी पंडित, श्रुती सडोलीकर, उत्तरा केळकर, बेला शेंडे यांच्या सुरेल प्रवास तसेच ज्येष्ठ पत्रकार वैजयंती कुलकर्णी- आपटे आणि पर्यटन क्षेत्रातील उद्योजिका संगिता पाटील यांच्या यशाचे गमक उलगडले आहे. याशिवाय महिलांसंबंधीच्या विविध सामाजिक समस्यांवरही मान्यवर लेखिकांनी प्रकाश टाकला आहे. याखेरीज सौंदर्य, साज-श्रृंगार, स्त्री- आरोग्य, जुनी-नवी आभूषणे तसेच विविध प्रांतातील पाककृतींची रेलचेल आहेच.
संपादक : मनोज चमणकर
पृष्ठे : १२९
मूल्य : १०० रुपये