Showing posts with label Zhunjaar महामुंबई झुंजार बाल मैफल. Show all posts
Showing posts with label Zhunjaar महामुंबई झुंजार बाल मैफल. Show all posts

Monday, November 23, 2015

स्वागत दिवाळी अंकांचे 5

स्वागत दिवाळी अंकांचे

Maifalबाल मैफल
हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक मराठी चेह-यांनी बस्तान बसवलं आहे. त्यातही दिग्दर्शक म्हणून या सृष्टीत आपलं बस्तान बसवणं तसं अवघडच. या मायावी नगरीत अनेक आघाडीच्या कलाकारांबरोबर भव्य-दिव्य निर्मितीसाठी नावाजलं गेलेलं नाव म्हणजे आशुतोष गोवारीकर. ‘लगान’, ‘जोधा अकबर’, ‘खेले हम जी जान से’यासारख्या लोकप्रिय चित्रपटांचा दिग्दर्शक असलेला आशुतोष गोवारीकर आता एक नवी खेळी खेळत आहे. ‘स्टार प्लस’ वाहिनीवर सुरु होणा-या ‘एव्हरेस्ट’ या भव्य मालिकेची निर्मिती तो करतोय. त्याच्या या नव्या साहसाविषयी व आतापर्यंतच्या त्याच्या प्रवासाविषयी त्याच्या बरोबर मारलेल्या गप्पांचा हा गोषवारा आजची बालमनं वाचनापासून ख-या अर्थाने दुरावली जात असताना ‘बालमैफल’ हा दिवाळी अंक आपल्या साहित्याच्या अनोख्या नजराण्याने बच्चे कंपनीला साद घालणारा ठरणार आहे. छोटय़ा दोस्तांसाठी विशेषत: मराठी, हिंदी, आणि इंग्रजी भाषेतून सजवलेला बालमैफल दिवाळी अंक हा चित्र, कथा, कविता, शब्दकोडी, बोधपर कथा, विनोद आणि विज्ञान आदी उपयुक्त माहितीच्या माध्यमातून बच्चे कंपनीला अगदी वेड लावणारा आहे. घर अंगणापासून पर्यावरण, इतिहास, मजेदार कविता ते मंगळ मोहीमेच्या यशाचं रहस्य सांगणारा शुभ मंगल सावधान हा लेख बालमनावर विशेष बिंबणारा आहे. मराठीतील दिवाणी चिमणी, आजीची प्रतिस्पर्धी, मूर्तीचे रहस्य , फुलपाखराचे बोल, हुंडा एक दुष्ट प्रथा, प्रदुषण व त्याचे दुष्परिणाम, हिंदीतील मंगलमय अभियान, नागकन्या का उपहार आदी बरोबरच इंग्रजीतील द नोबेल पिपल, माय हॉबी, धोंडो केशव कर्वे आदी लेख, कथा बालमनावर पगडा बसविणा-या असून अंतरी वाचन संस्कृती जागविणा-या आहेत.
संपादक: कुमार कदम,
पृष्ठ: १५२, मुल्य: ५० रुपये

Zhunjaarमहामुंबई झुंजार
२०१४ मध्ये पार पडलेली १६ वी लोकसभा निवडणूक ही संपूर्ण देशाला कलाटणी देणारी ठरली. त्यामुळेच महामुंबई झुंजार या दिवाळी अंकामध्ये आत्तापर्यंत झालेल्या सर्वच लोकसभा निवडणुकांचा लेखा-जोखा मांडणारा प्रदीर्घ लेख दिला आहे. भारताच्या ६७ वर्षाच्या राजकीय प्रवासात अनेक राजकीय, सामाजिक, धार्मिक, जातीय, भाषिक संघर्ष अथवा राज्यीय मतभेद झाले असतानाही भारतीय मतदारांनी आपला मतदानाचा हक्क सांभाळत भारतीय लोकशाही टिकवून ठेवली. येथे सातत्याने निवडणुकांच्या माध्यमातूनच सतापरिवर्तन घडत आले. अशा १९५२ पासून ते २०१४ पर्यंत आतापर्यंत झालेल्या १६ लोकसभा निवडणुकांची इत्यंभुत माहिती या लेखातून देण्यात आली आहे. लेखाच्या सुरवातीला मे २०१४ मध्ये झालेल्या १६ व्या लोकसभेचा आढावा घेण्यात आला आहे. त्यानंतर स्वंतंत्र भारतातील निवडणुकांची पूर्वतयारी कशी होती याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर १९५१-५२, १९५७, १९६२, १९६७, १९७१, १९७७, १९८०, १९८४, १९८९, १९९१, १९९६, १९९८, १९९९, २००४, २००९ या साली झालेल्या लोकसभा निवडणुकांचा संक्षिप्त आढावा घेण्यात आला आहे. एकुणातच पंडित जवाहरलाल नेहरुंपासुन ते नरेंद्र मोदींपर्यंतच्या सर्व पंतप्रधानांबद्दल सांगणारा असा हा लेख आहे. याशिवाय या दिवाळी अंकामध्ये कथा विभागामध्ये तुम्हाला काही बहारदार कथा वाचायला मिळतील.
संपादक : विजय सामंत,
पाने : ९३, किंमत : ६० रूपये.

Bhakti Sangamभक्तिसंगम
दिवाळी हा सण दिव्यांचा, आनंदाचा उत्साहाचा सण म्हणून ओळखला जातो. परंतु, दिवाळी हे भक्तिपर्व देखील आहे. कारण अनेक साधक लक्ष्मीपूजन आणि दिवाळीच्या पाडव्याचे औचित्य साधून काही साधनेला आरंभ करतात. साधक आणि भक्तांच्या आध्यात्मिक भूकेचा विचार करून संपादक सुधाकर रावजी सामंत यांनी भक्तीसंगममध्ये लेखांची निवड केली आहे. अंकामध्ये अनेक आध्यात्मिक अभ्यासकांच्या लेखांबरोबरच देशभरातील संतांच्या कामगिरीवर प्रकाश टाकला आहे. याशिवाय काही महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचीही माहिती
दिली आहे.
संपादक : सुधाकर रावजी सामंत,
पाने : ९८किंमत : ५० रुपये

Maifalसाहित्य मैफल
साहित्य मैफलचा यंदाचा दिवाळी अंकही खुसखूशीत फराळाप्रमाणेच वैचारिक फराळ घेऊन आला आहे. देशातील शास्त्रज्ञांनी नुकतीच फत्ते केलेल्या ‘मंगळयान’ मोहिमेवर या अंकात खोलवर प्रकाश टाकला आहे. तसेच ‘बचपन बचाव’ चळवळीच्या माध्यमातून बाल कामगारांची बाल मजुरीपासून मुक्तता करून त्यांच्या शिक्षणसाठी झटणारे नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी आणि पाकिस्तानात मुलींच्या शिक्षणासाठी प्राण पणाला लावून तालिबान्यांच्या विरोधात संघर्ष करणारी मलाला युसुफझाई यांच्या कार्याचाही आढावा घेण्यात आला आहे. या शिवाय कथा, कविता, लेख यांचाही फराळ येथे आहेच.
संपादक : कुमार कदम,
पृष्ठ : १९२, किंमत : ९० रुपये

Lilaiलीलाई
दिवाळीचे पदार्थ म्हणजे तिखड, गोड, खुसखुशीतपणाचा मिलाफ. ‘लिलाई’ दिवाळी अंकही एकप्रकारे दिवाळीच्या फराळासारखाच आहे. ‘भ्रष्टाचाराचे मूळ कशात आहे?’ हा न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांचा लेख, ‘काश्मीरमधील धुमसते हिम’ हा फ्रान्सिस दिब्रिटो यांचा लेख तिखटाची भूमिका पार पडतात. तर पु.द. कोडोलिकर यांची कथा विनयभंगाची, माझ्या ‘अच्छे दिनां’ची गोष्ट ही नितीन मोरे यांच्यासह ह. शि. खरात आणि स्टॅन्ली घोन्सालविस यांच्या विनोदी कथांनी अंकाला खुसखुशीत केले आहे. ‘नाना’गिरी मध्ये गंगाराम गवाणकर नाना पाटेकरांच्या अभिनयातील ‘नाना कळा’ उलगडून दाखवल्या आहेत. परिसंवाद भाग आणि भाग दोनमध्ये चित्रपट क्षेत्राबरोबर अन्य  क्षेत्रातील कलाकारांनी संवाद साधला आहे. काव्यांगणमध्ये शिरीष पै, ना.धों महानोर, फ.मु. शिंदे यांच्या कवितांबरोबरच डॉ. महेश केळुस्कर यांची ‘दिल्या घेतल्या वचनांची’, साहेबराव ठाणगे यांची ‘झाडे’, शैलेंद्र शिर्के यांची ‘दंगल पेटते तेंव्हा’ या कविता वाचनीय आहेत. विजया राजाध्यक्ष, डॉ. विजया वाड, दत्ता केशव यांच्या सह अन्य लेखकांच्या कथांनी अंकाला अधिकच लज्जत आणली आहे.
संपादक : अनिलराज रोकडे
पाने : २०४ किंमत : १२५