Monday, November 23, 2015

स्वागत दिवाळी अंकांचे 12

निळू दामलेंचा 'पंतप्रधान विकणे आहे' हा लेख नेत्याचे मार्केटिंग या अभिनव कल्पनेचा वेध घेणारा आहे. परंतु हा बव्हंशी तपशीलाच्या, माहितीच्या पातळीवरच राहतो. विश्लेषण, विवेचन फारसे खोल जाताना दिसत नाही.
सेल्फी' या सदरामधे तरुण मंडळींच्या स्वतःच्या आयुष्याचा वेध घेणारे लेख आहेत. यात आपल्या समवयस्कांपेक्षा वेगळे असल्याची रास्त जाणीव असलेल्या नि त्याचे बरेवाईट परिणाम सहन कराव्या लागणार्‍या श्रुती आवटेने शब्दबद्ध केलेले 'सटकलेली माझी पिढी' हे सेल्फी लेखन आवर्जून वाचण्याजोगे. गृहितकानुसार दंभ-श्रेष्ठत्वाचे जगणे मिळालेल्या ब्राह्मण समाजात असल्याचे काही नकारात्मक परिणाम अनुभवणार्‍या कौस्तुभचे 'आहे मी ब्राह्मण मग?' हे देखील विचाराला चालना देणारे ठरावे.
कथांच्या जंत्रीमधे बोकीलांची 'चित्ता' संपूर्ण निराश करणारी. पालावरचं जिणं जगायला लागू नये म्हणून बापाने वसतिगृहात आणून सोडलेल्या कुण्या छोट्याची 'घरा'ची ओढ नि त्यासाठी त्याने वसतीगृहातून पळ काढत अंधाराच्या नि डोक्यावरून जाणार्‍या विजेच्या तारांच्या सोबतीने केलेला प्रवास हा कथेचा गाभा नि पुरा विषयही. अशा वेळी घटनांपेक्षा त्या मुलाच्या मानसिक आंदोलनांना, विचारांना, अनुभवांना कथेचा मुख्य आधार बनवावे लागते. दुर्दैवाने मला तरी त्या मुलाचे पात्र उभे राहिले तरी व्यक्तिमत्व उभे राहिले असे वाटले नाही. त्या ऐवजी परिसरघटकांचे येणारे तपशील कंटाळवाणे होत जातात. त्या परिसरघटकांच्या कथनातून्/मांडणीतून निसर्गालाही त्या पात्राच्या भावनेच्या आवर्तात आणणे शक्य असते. ते ही फारसे साधले आहे असे म्हणू शकत नाही.
उत्पल व. बा. यांची मला स्वतःला बेहद्द आवडलेली 'फ्रेंड्स' ही कविता 'f कविता' (फेसबुकवरच्या कविता) या सदरात पाहून फारच आनंद झाला. त्याबाबत मी थोडे विवेचन माझ्या 'अनाहत'च्या ऑक्टोबरच्या अंकात केलेले आहेच. अक्षरच्या संपादकांना या निवडीबद्दल धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. संध्या सोमण यांची कविताही आधीच फेसबुकवर वाचलेली नि आवडलेली.
अकोलकरांचा रफिक, रशीद आणि दरायुस (हा पर्शियाचा राजा, याचा उच्चार दरायस असा आहे असा माझा समज आहे.) या चित्रपटप्रेमींवरचा लेख स्वतंत्रपणे एकेकाच्या चित्रपटवेडाला अनुभवण्यासाठी अवश्य वाचावा. फक्त तिघांचा एकत्र लेख लिहिताना सांधा नीट न जुळल्याने वाचताना काहीसा गोंधळ उडतो. सतीशबाबाची ना.मा. निराळे नेहेमीप्रमाणेच सफाईदार पण आश्चर्यकारकरित्या सरळ विणीची. बाबाचे नेहेमीचे वळसे/पेच फारसे नाहीत.
या सार्‍या पसार्‍यात आवर्जून उल्लेख करावेत नि वाचावे'च' असा सल्ला द्यावा असे दोन लेख. पहिला गजू तायडेंचा ग्राफिक्स नॉवेलवरचा लेख. निव्वळ कॉमिक्स या स्वरूपात आपण पहात आलेला इलस्ट्रेशनचा नि त्यापुढे थेट चित्रांचा वापर निव्वळ मुलांची करमणूक वा इलस्ट्रेशन पुरता न ठेवता परिपूर्ण अशा चित्रभाषेत करून त्या आधारे साहित्यिक आविष्कार करणे या तुलनेने कमी प्रसिद्ध अशा परंपरेची ओळख करून घेणे मस्ट.
आणि दुसरी कन्नड लेखक वसुधेंद्र यांची द्वा.व. अरवंदेकरांनी अनुवाद केलेली 'जिथे क्षमा केली जात नाही' ही कथा. या कथेने मला अंतर्बाह्य हलवून सोडले. आमचे दिवंगत मित्र श्रावण मोडक यांच्याबरोबर झालेल्या 'सुप्त हिंसा' याविषयावरील चर्चेची तिने आठवण करून दिली. हिंसा ही नेहेमीच रक्त काढणार्‍या शस्त्रांनी केली जाते असे नव्हे. विचारांचे आदानप्रदान करण्यासाठी, प्रगती साधण्यासाठी निर्माण केलेली संवादी साधनेही कशी हिसेंचे अक्राळविक्राळ हत्यार बनून जातात याची हादरवून टाकणारी अनुभूती तिने दिली. ईमेल, फेसबुक, ट्विटर यासारखी संपर्कमाध्यमे वापरणार्‍यांना आपल्या मनात डोकावून पहायला भाग पाडणारी कथा, माझ्या मते या अंकाचा चरमबिंदू! (हिच्यावर स्वतंत्रपणे लिहायला हवे.) कथांच्या यादीतच गणेश मतकरींची 'शूट' ही कथा चित्रपटांच्या परिभाषेला, त्यातील परिमाणांना कथेमधे बेमालूमपणे सामावून घेणारी.
शिफारसः
१. 'जिथे क्षमा केली जात नाही' - मूळ लेखक वसुधेंद्र, अनुवादक: द्वा.व. अरवंदेकर
२. 'फ्रेंड्स' (कविता) - उत्पल व. बा.
३. चित्र-शब्दांचं गारुड - गजू तायडे

No comments:

Post a Comment