Monday, November 23, 2015

स्वागत दिवाळी अंकांचे 13


विविध दिवाळी अंकांमधील साहित्याचा परिचय-
लोकसत्ता
सर्वसमावेशक विषयांमुळे ‘लोकसत्ता’चा दिवाळी अंक परिपूर्ण ठरला आहे. अंकाची सुरुवात गुलजारांच्या अक्षरचित्रांनी होते. गुलजारांच्या कथांचा अनुवाद अंबरिश मिश्र यांनी केला असून या कथांमधून माणसाच्या जगण्याचे विविध कंगोरे दिसतात. ‘आयटी - एक जीवनशैली’ या विभागामध्ये आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची मन:स्थिती, त्यांचे कौटुंबिक, सामाजिक जीवन, त्यांची बदलत जाणारी जीवनशैली या सगळ्याचा आढावा घेतला आहे. आपल्याकडे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हा प्रकार रुजायला लागला आहे. याबद्दलची चर्चा ‘लग्नाविना सहजीवन’ या विभागात करण्यात आली आहे. या संदर्भात करिना कपूर, अनुपमा नारनवरे, भरत दाभोळकर यांचे लेख वाचनीय आहेत. प्रशांत कुलकर्णी यांच्या ‘दुर्मीळ बाळासाहेब’ या लेखामध्ये बाळासाहेबांची मार्मिक आणि दुर्मीळ व्यंगचित्रे आहेत. अरब देशांमध्ये झालेल्या क्रांती, त्यांच्यामागचे राजकारण आणि त्याचे होणारे परिणाम या सर्वाचा वेध गिरीश कुबेर यांनी त्यांच्या ‘अनौरस क्रांती’ या लेखामध्ये घेतला आहे. फसलेल्या क्रांत्या या विभागात ‘ऑक्युपाय’ - एक क्लोजप’! आणि ‘जनआंदोलन नव्हे; नेत्यांचे अपयश’ हे लेख आहेत. भारतीय चित्रपटांमधील बदलांचा वेध घेणारा ‘बदलता सिनेमा’ हा विभाग अंकामध्ये आहे. यामध्ये अनुराग कश्यप, सत्यजित भटकळ यांचे लेख आहेत. ‘एक अस्वस्थ वादळ : गो. रा. खैरनार’ या लेखात खैरनार यांच्या जीवनाचा उत्तरार्ध चित्रित केला आहे.
व्यवस्थापकीय संपादक : गिरीश कुबेर, पृष्ठ संख्या : १९२, किंमत : १०० रुपये
दीपावली
दीपावलीच्या अंकाची सुरुवात होते ती सुहास बहुळकर यांच्या ‘कलावंत आणि मॉडेल’ या लेखाने. चित्रांमधील नग्नता, अश्लीलता यावर भाष्य करणारा हा लेख आहे. ‘माझा मित्र ग्रेस आणि कवी ग्रेस’ हा रामदास भटकळ यांचा लेख ग्रेस यांची दोन उत्कट रूपं दाखवतो. मानसोपचारतज्ज्ञ आनंद नाडकर्णी यांच्या व्यक्तिमत्त्वाची एक वेगळी बाजू ‘माझा आनंदा’ या अनिल अवचट यांच्या लेखामधून दिसते. द्वारकानाथ संझगिरी यांनी आपल्या ‘लढवय्यांच्या देशात चार दिवस’ या लेखातून इस्र्रायलची सैर घडवली आहे. इस्र्रायलचा इतिहास, तेथील समाजजीवन, लोकांची आपल्या देशाबद्दलची त्यागाची भावना या गोष्टी त्यांच्या लेखातून जाणवतात. तसेच इस्र्रायलने विविध क्षेत्रात केलेला भीम पराक्रमदेखील या लेखाच्या निमित्ताने दिसतो. या अंकातील कथा अंकाची वाचनीयता वाढवतात. अंकाच्या मुखपृष्ठावरील चित्र आकर्षक आहे.
संपादक - अशोक कोठावळे, पृष्ठ संख्या - २२७, किंमत - १०० रुपये.
ऋतुरंग
यंदाच्या ऋतुरंगच्या दिवाळी अंकामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या गतस्मृतींना उजाळा दिला आहे. अंकाची सुरुवात ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नैयर यांच्या लेखाने होते. आपल्या पाकिस्तानमधल्या ‘पीरसाहेबां’च्या आठवणीमध्ये हरवलेले नैयर आपल्याला जुन्या पाकिस्तानची सैर करून आणतात. बालपणीच्या आठवणींमध्ये रमलेले नाना पाटेकर वास्तव स्वीकारायला तयारच नाहीत. शिवचरित्र कथनाची पंन्नास वर्षे कशी सरली, लोकांनीच शिवशाहीर कसे केले आणि आजही शिवचरित्र जगण्याची प्रेरणा कसे देते या आपल्या आठवणींचे पदर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या लेखात उलगडले आहेत. बातमीच्या पलीकडे या लेखात जेष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांनी आपले दिल्लीतील अनुभव सांगितले आहेत. मी आणि माझे मद्यपान या लेखात ‘लोकसत्ता’चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर यांनी मद्यपानाच्या निमित्ताने अनेक जुन्या किश्श्यांच्या, मैफिलींच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.
संपादक : अरुण शेवते, पृष्ठ संख्या : १८८, किंमत : १०० रुपये,
धनंजय
धनंजय या दिवाळी अंकामध्ये विविध कथांचे प्रकार आहेत. कथांची सुरुवात प्रेम वैद्य यांच्या बंगालचा मुक्तिसंग्राम या कथेने होते. फिल्म डिव्हिजनसाठी केलेल्या चित्रीकरणाच्या निमित्ताने त्यांनी प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन जे अनुभव घेतले ते या लेखामधून दिसतात. ‘सूर लावते ती मीच की मी नाही? गूढ काही’ हा आरती अंकलीकर-टिकेकर यांचा लेख वाचनीय आहे. ‘फ्रोलाईन उनबेकान्र’ या बाळ फोंडके यांच्या लेखामध्ये त्यांनी ८० वर्ष जुन्या सांगाडय़ांच्या डी.एन.ए मिळवून त्यातून रोमोनॉव्ह राजघराण्याच्या वंशजांच्या शोधाच्या कामाची चित्तथराराक कथा आहे. ‘जसवंतगढचे गूढ’ हा लेख जसवंतसिंग या भारतीय वीराच्या पराक्रमाची आठवण करून देणारा आहे.
संपादक : नीलिमा कुलकर्णी, पृष्ठ संख्या : ३७६, किंमत : १२० रुपये.
एकता
एकता मासिकाच्या दिवाळी अंकात स्वामी विवेकानंद यांच्यावरील लेख वाचायला मिळतात. विवेकानंदांच्या शतकोत्तर सुवर्णजयंती निमित्त डॉ. वि. रा. करंदीकर यांनी विवेकानंदांच्या संपूर्ण जीवनचरित्राचा आढावा घेणारा लेख लिहिला आहे. भगवान गौतम बुद्ध आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनात सेवा हा समान धागा आहे. समाजाची सेवा करण्याचा संदेश दोघांच्याही जीवनात दिसतो. या दोघांच्याही शिकवणीतील साम्य ज्येष्ठ विचारवंत रमेश पतंगे यांनी आपल्या ‘तथागत आणि स्वामी विवेकानंद’ या लेखामध्ये सांगितले आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा जीवनप्रवास उलगडणारा ‘देवराष्ट्र ते दिल्ली’ हा डॉ. न.म.जोशी यांचा लेख या अंकात आहे. तसेच यशवंतराव चव्हाणांच्या पत्नी वेणुताई यांचे यशवंतरावांच्या कारकीर्दीतील योगदान दाखवणारा वसुधा परांजपे यांचा ‘हिमालयाची सावली’ हा लेख आहे.
संपादक : विद्याधर ताठे, पृष्ठ संख्या : १९८, किंमत : १५० रुपये.
चंद्रकांत
चंद्रकांत या दिवाळी अंकामध्ये सहा कादंबऱ्यांमधील काही भाग कथारूपाने देण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर फिल्म डिव्हिजनने वीर सावरकर हा चित्रपट बनवला. या चित्रपटाच्या निर्मितीची कहाणी आणि फिल्म डिव्हिजनच्या सुरुवातीच्या काळामधील कार्याचा परिचय करून देणारा प्रेम वैद्य यांचा लेख वाचनीय आहे. ‘रारंग ढांग’ या प्रभाकर पेंढारकर यांच्या कादंबरीवर लिहिलेली श्रीकृष्ण सवदी यांची दीर्घकथा एका अभियंत्याचा वेगळा प्रवास दाखवते. ‘फिरूनी पुन्हा जन्मेन मी’ ही दीर्घकथा म्हणजे जॉन गॉदेय यांच्या ‘द स्नेक’ या कादंबरीचा अनुवाद असून यामध्ये मानवी जीवनाचे एक वेगळेच अंग पाहायला मिळते. दर्जेदार दीर्घकथा हे या दिवाळी अंकाचे वैशिष्टय़ आहे.
संपादक : नीलिमा कुलकर्णी, पृष्ठ संख्या : ३२०, किंमत : १२० रुपये.
आपला परम मित्र
परम मित्रच्या दिवाळी अंकात साहित्य, संस्कृती, इतिहास, चित्रपट आणि काही सामाजिक विषयांचा समावेश आहे. अंकाची सुरुवात होते ती साधना बहुळकर यांच्या ‘त्या दोघांच्या स्त्री-प्रतिमा’ या लेखापासून. गुस्ताव क्लिम्ट आणि रवी वर्मा हे दोघे समकालीन चित्रकार होते. दोघांनी रेखाटलेल्या स्त्री-प्रतिमांचा या लेखात मागोवा घेण्यात आला आहे. आपल्या ‘इतिहासाचे उपेक्षित वारसदार’ या लेखामध्ये पेशवे, इब्राहिम गारदी आणि अन्य काही कर्तृत्ववान लोकांच्या हयात असणाऱ्या वंशजांचा परिचय आणि त्यांच्या समाजाकडून असणाऱ्या अपेक्षा मांडण्यात आल्या आहेत. ‘अस्वस्थ शतकाचा दिग्दर्शक मृणालदा’ या लेखामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक मृणाल सेन यांची कारकीर्द, त्यांच्या चित्रपटांचं वेगळेपण याची चर्चा केली गेली आहे. रशियाने इजिप्तला दिलेलं लढाऊ मिग विमान इस्रायलने पळवून आणलं ही चित्तथरारक कथा ‘ऑपरेशन पेनीसिलीन इराकी मिग-२१ चं साहसी हरण’ या पंकज कालुवाला यांनी लिहिली आहे.
संपादक - माधव जोशी, पृष्ठसंख्या - १७६, किंमत - १०० रुपये.
मैत्रीण
मैत्रीणचा दिवाळी अंक हा वैविध्याने बहरलेला आहे. या अंकात मनामनातलं नातं, वेगळं क्षितिज, कथा, कविता असे विभाग आहेत. सावनी शेंडे आणि बेला शेंडे या गायक भगिनींच्या नात्यातली ‘स्पेस’ सांगणारा, आरती कुहीकर यांनी शब्दांकित केलेला लेख. प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाष यांच्या मधलं विश्वासाचं नातं उलगडणारा वैजयंती कुलकर्णी यांचा लेख हे या विभागाचे वैशिष्टय़ आहे. वेगळं क्षितिज या विभागात रोबोट बनवणारं सॉफ्टवेअर विकसित करणाऱ्या अरुंधती जोशी, अर्थतज्ज्ञ आणि अ‍ॅक्च्युरी असणाऱ्या दीपा पंडित आणि बार कौन्सिलच्या पहिल्या महिला सचिव डॉ. वर्षां रोकडे यांचा थक्क करणारा यशस्वी प्रवास येथे पाहायला मिळतो. या व्यतिरिक्त गुरू ठाकूर, किशोर कदम आणि प्रज्ञा पवार यांच्या कवितादेखील या अंकाची वाचनीयता वाढवतात.
संपादक : वर्षां सत्पाळकर, पृष्ठ संख्या : १६०, किंमत : १०० रुपये.
भटकंती
मुशाफिऱ्यांसाठी पर्वणी ठरावा असा भटकंती दिवाळी अंक आहे. अतिथी संपादक मिलिंद गुणाजी यांनी केरळमधील पल्लकडच्या सौंदर्याचे दर्शन घडवले आहे. कच्छच्या रणाची अनोखी सफर ‘गुजरात मधील व्हाइट डेझर्ट’ या लेखात अरविंद आपटे यांनी घडवली आहे. टायटॅनिकच्या जलसमाधीला यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. टायटॅनिकची बांधणी ज्या बेलफास्ट येथे झाली त्या कलानगरीचं दर्शन श्वेता चिटणीस यांच्या ‘टायटॅनिकचं जन्मस्थान’ या लेखात घडतं. गूढरम्य कसिनो या लेखामध्ये जगातील प्रसिद्ध कसिनोची सैरच होते. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या ग्रीन हीरोंची ओळख करून देणारा ‘ग्रीन हिरोज’ हा विभाग समाजातील संवेदनशीलतेचे दर्शन घडवतो. सुंदर छायाचित्रे हे या अंकाचे वैशिष्टय़ आहे.
संपादक : वर्षां सत्पाळकर, पृष्ठ संख्या : १६०, किंमत : १०० रुपये
अ‍ॅग्रोटेक
शेती करताना ज्यांनी साहित्याचे मळे फुलवले अशा साहित्यिक शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून शेती कशी दिसते हे सांगणारा लेख रविप्रकाश कुलकर्णी यांनी लिहिला आहे. यामध्ये त्यांनी ना.धों.महानोर, व्यंकटेश माडगूळकर आणि सदानंद देशमुख यांचे चित्रण केले आहे. ‘सेलिब्रेटिजची शेती’ या विभागात विक्रम गोखले, अशोक हांडे, सयाजी शिंदे, सचिन पाठक, देविदास चौधरी यांची शेती आणि त्यांचा शेती करण्याचा अनुभव यामध्ये देण्यात आला आहे. खा. हरिभाऊ जावळे यांच्या ‘ऑस्ट्रेलियातील आधुनिक शेती’ या लेखामध्ये शेतीमध्ये आलेले नवीन तंत्रज्ञान, नवी पिकं, त्यांची बाजारपेठ आणि ऑस्ट्रेलियातील शेतकऱ्यांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहायला मिळतो. गेल्या काही वर्षांमध्ये ग्रामीण भागातील कथेवर आधारित आणि कृषी क्षेत्राशी संबंधित काही मराठी चित्रपट आले या सर्व चित्रपटांचा आढावा ‘कृषिप्रधान मराठी चित्रपट’ या दिलीप ठाकूर यांच्या लेखामध्ये घेण्यात आला आहे.
संपादक : गणेश हाके, पृष्ठ संख्या : १३०, किंमत : ५० रुपये.
ललित
नरेंद्र चपळगावकर यांच्या ‘बी रघुनाथ’ या लेखामध्ये, बी. रघुनाथ या मराठवाडय़ातील फारशी प्रसिद्धी न मिळालेल्या पण दर्जेदार साहित्याची निर्मिती करणाऱ्या साहित्यिकाचा परिचय करून देण्यात आला आहे. दीपक घारे यांच्या ‘जोग सर’ या लेखात जोग सरांचे घारे यांच्या आयुष्यातील स्थान आणि अशोक जोग यांचं व्यक्तिमत्त्व पाहायला मिळतं. आसामी लोकांच्या जगण्याचे आणि आसामी संस्कृतीचे दर्शन मित्रा फुकन यांच्या लेखनातून वारंवार होते. मीना वैशंपायन यांनी ‘अनोखा आसामी राग-मित्रा फुकन’ या लेखामध्ये मित्रा फुकन यांच्या साहित्याचा आढावा घेतला आहे. बंगालमधील धाडसी लेखिका मैत्रेयीदेवी यांच्या साहित्याचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय ‘वंग लेखिकेचे अदम्य धाडस’ या नंदिनी आत्मसिद्ध यांच्या लेखात करून देण्यात आला आहे.
संपादक : अशोक कोठावळे, पृष्ठ संख्या : १९२, किंमत : ८० रुपये.
सामना
देशातील महागाईच्या प्रश्नाचा वेगवेगळ्या लेखांच्या माध्यमातून घेतलेला वेध हे सामनाच्या दिवाळी अंकाचे वेगळेपण आहे. ‘महागाईची दिवाळी’, द. मा. मिरासदार यांचा ‘ती दिवाळी हरवली’ , ‘कवीचा एल्गार’ हा अरुण म्हात्रे यांचा लेख आणि ‘ती महागाई’ हे लेख वाचनीय आहेत. कथा विभागामध्ये गिरिजा कीर यांची ‘एकदा एका प्रवासात’ ही कथा चांगली आहे. ‘बर्फ नव्हे ते रक्त आमुचे’ ही विनायक अभ्यंकर यांची कथा १९६२ च्या युद्धातील पराभवाची मिमांसा करणारी आहे. आपल्या तत्कालीन सरकारच्या चुकीच्या धोरणांवर या कथेमध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे. ‘त्याग’ ही अंजली बोंगाळे यांची कथा नात्यातील जिव्हाळा दाखवणारी आहे. बॉम्बस्फोट आणि देवाघरचा न्याय या कथादेखील वाचनीय आहेत. ‘दलालांची टीकाचित्रे’ हे सामनाच्या अंकाचे वैषिष्टय़ मानावे लागेल.
संपादक : बाळ ठाकरे, पृष्ठसंख्या : १५२
लाजरी
कर्तृत्ववान महिलांच्या कर्तृत्वाचा परिचय करून देणारा अंक असे लाजरीच्या दिवाळी अंकाचे वर्णन करावे लागेल. यामध्ये म्यानमारच्या स्वातंत्र्याचा हुंकार बनलेल्या आँग सान सू की, परिस्थितीशी दोन हात करून ऑलिम्पिकची मजल मारणारी मेरी कोम आणि लायबेरिन देशातील गृहयुद्धामध्ये महिलांचा आधार बनलेल्या लेमॅह ब्वॉवी यांच्या कार्याचा आढावा घेतला आहे. या शिवाय ‘शब्बो ते हमिदाबाई व्हाया नीना कुलकर्णी’ या लेखात नीना कुलकर्णी यांचा अभिनय प्रवास उलगडला आहे. तर अनघा दिघे यांनी आपल्या लेखातून थिएटर गुरू इब्राहिम आल्काझी यांना शब्दांच्या माध्यमातून रेखाटले आहे. या शिवाय विविध ठिकाणची खाद्यसंस्कृतीदेखील अंकात दिली आहे.
संपादक : अजित पडवळ, पृष्ठ संख्या : १४८, किंमत : १०० रुपये.
श्री सद्गुरु साईकृपा
या अंकामध्ये गंगेचे आध्यात्मिक महत्त्व सांगणारा ‘देवी गंगा’ हा डॉ. सुषमा सातपुते यांचा लेख आहे. तर जगन्नाथ पंडितांची गंगेप्रति असणारी भक्ती ‘जगन्नाथ पंडितांची गंगाभक्ती’ या लेखात दिसते. डॉ. माधव दीक्षित यांच्या ‘गंगेच्या तीर्थजलातील रासायनिक तत्त्वे आणि पर्यावरण’ या लेखात गंगेचे वैज्ञानिक महत्त्व मांडले आहे.
संपादक : बाळ जाधव, पृष्ठ संख्या : १४४, किंमत : ६० रुपये.
श्री दीपलक्ष्मी
श्री दीपलक्ष्मी अंकामधील राजेश खन्नाचा जीवन प्रवास सांगणारा ‘राजेश खन्ना’ हा संजीव पाध्ये यांचा लेख आणि ‘जेम्स बॉण्ड नॉक आऊट ५०’ हा डॉ. श्रीकांत मुंदरगी यांचा लेख हे या दिवाळी अंकाचे बलस्थान आहे. ‘मास्टर भगवान मर्दानी नायक, अभिजात नर्तक’ या लेखामध्ये अरुण पुराणिक यांनी मास्टर भवान या अभिजात अभिनेत्याच्या कारकिर्दीचा आढावा घेतला आहे. अभिनय आणि नृत्यकला यांच्या जोरावर चित्रपट क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या मास्टर भगवान यांच्या व्यक्तीगत जीवनाचे चित्रणदेखील या लेखामध्ये आहे. यशस्वी प्रकाशक हर्षां भटकळ यांची सुभाष अवचट यांनी मुलाखत घेतली आहे. अंकातील विनोद मार्मिक आहेत.
संपादक : हेमंत रायकर, पृष्ठ संख्या : २४८, किंमत : १२० रुपये.
जिद्द
अंकाची सुरुवात ‘शूर्पणखेचे रहस्य’ या एस. काळसेकर यांच्या लेखापासून होते. यामध्ये शूर्पणखेचे सहसा न वाचायला मिळणारे वर्णन आहे. श्रीलंकेतून तिचे इतक्या लांब येणे, रावणाचे नाविक दल, त्या वेळची भौगोलिक स्थिती या गोष्टींची माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची दक्षिण दिग्विजयी मोहीम, त्या मोहिमेचे ऐतिहासिक महत्त्व, त्यामागचे राजकीय डावपेच आणि दक्षिणेतील तत्कालीन सामाजिक परिस्थिती याची माहिती देणारा अरुण भंडारे यांचा लेख अंकामध्ये आहे.
संपादक : सुनील राज, पृष्ठ संख्या : ९२, किंमत : ५० रुपये.

1 comment: