ऐक्य समूह
जडण-घडणविद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे संयुक्त व्यासपीठ असलेल्या जडण-घडणच्या या वर्षीच्या दिवाळी अंकात संरक्षण विषयक विशेष लखांचा समावेश आहे. तळ हातावर शिर घेऊन सीमेवर आपल्या देशबांधवांच्या रक्षणासाठी रात्रंदिवस खडा पाहरा देणाऱ्या आपल्या जवानांसाठी बऱ्याच वेळा युद्ध किंवा संघर्ष हा रोजचाच असतो. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, असं सैनिकाचं जीवन असतं. सैनिकांच्या या जीवन संघर्षावरचे आयुष्याचा गुरुमंत्र, एअर मार्शल भूषण गोखले, आकाशझेप विंग कमांडर राकेश शर्मा, राष्ट्र उभारणीत सैन्य दलातील भूमिका, ले.ज. दत्तात्रय शेकटकर, फिल्ड मार्शल माणेकशॉ, ले. ज. एस. पी. पी. थोरात, धुरंदर सेनानी समीर देशपांडे या लेखांसह मोहिते घराण्याची शौर्य गाथा हा सदाशिव शिवदे आणि शौर्याचे धारकरी प्रभाकर सिनारी यांच्यावर लिहिलेला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा लेख विशेष वाचनीय आहे.
जडण-घडण
संपादक : डॉ. सागर देशपांडे
प्रकाशक : सह्याद्री प्रकाशन
101, पहिला मजला,
रामकृष्ण परमहंस गृहरचना,
पर्वती पुलाजवळ, सिंहगड रोड,
पुणे-30.
पृष्ठे : 210, किंमत : 130 रु.
गुंफण
पुनर्जन्म किती वास्तव...किती थोतांड? या विषयावरील विशेष परिसंवादात डॉ. विश्वास मेहेंदळे, शिरीष कुलकर्णी, डॉ. कन्हैया कुंदप, मोरेश्वर जोशी, प्रताप गंगावणे आणि ऍड. मुक्ता दाभोलकर यांचे "गुंफण' दिवाळी अंकातील लेख वाचनीय आहेत. पहिल्या महायुद्धाची शताब्दी आणि दुसऱ्या महायुद्धाच्या 75 व्या वर्षानिमित्त डॉ. अशोक चौसाळकर, जयवंत गुजर आणि प्रताप गंगावणे यांचे लेख आहेत. जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. ज्येष्ठराज जोशी यांच्या कार्याचा परिचय त्यांचे बंधू मोरेश्वर जोशी यांनी करून दिला आहे. याशिवाय कथा, पर्यटन विषयक लेख, कविता,प्राचार्य रमणलाल शहा यांचे वर्षभविष्य, असे वाचनीय साहित्य आहे. विनोदी कथा स्पर्धेतील पहिल्या तीन कथांचाही या अंकात समावेश आहे. गेली वीस वर्षे गुंफणने सुरू ठेवलेली दर्जेदार दिवाळी अंकांची परंपरा यावर्षीही कायम आहे.
गुंफण
संपादक : बसवेश्वर चेणगे
कार्यकारी संपादक : गजानन चेणगे
प्रकाशक : "गुंफण', किवळ रोड, नवे गावठाण, मसूर, ता. कराड, जि. सातारा.
पृष्ठे : 180, किंमत : 100 रुपये.
आक्रोश
विनोदी आक्रोशच्या दिवाळी अंकात चंद्रकांत महामिने यांची विनोदी कादंबरी, द. मा. मिरासदार, नागेश शेवाळकर, बंडा यज्ञोपवित, प्रा. अजित पाटील, प्रा. व. बा. बोधे यांच्या कथा, खलिल खान, ज्ञानेश सोनार, प्रशांत आष्टीकर यांच्यासह व्यंगचित्रकारांची हास्यचित्रे, वात्रटीका आणि कविता यांचा समावेश आहे. विनोद या विषयांना वाहिलेला या दिवाळी अंकाची सजावटही उत्तम आहे.
आक्रोश
संपादक : ज्ञानेश वि. जराड
प्रकाशक : आक्रोश प्रकाशन,
फलटण, जि. सातारा.
पृष्ठे : 208, किंमत : 100 रुपये
जनमंगल
सुरेख मांडणी, आकर्षक सजावट आणि पानिपतकार विश्वास पाटील, द. मा. मिरासदार, शिरीष कुलकर्णी, डॉ. भारतकुमार राऊत, डॉ. भालचंद्र कानगो, भाई वैद्य, डॉ. प्रकाश पवार यांच्या कथा आणि लेखांनी जनमंगलचा हा दिवाळी अंक विशेष वाचनीय झाला आहे. प्रा. मंजिरी फडके यांचे विशेष राशी भविष्यही आहे."राजकारण काल आणि आज' या विषयावरच्या परिसंवादातील लेख सध्याच्या सत्ताकेंद्रे आणि घराणेशाहीच्या राजकारणावर प्रकाशझोत टाकणारे आहेत.
जनमंगल
संपादक : ऍड. वर्षा माडगुळकर
प्रकाशक : साप्ताहिक जनमंगल
राजधानी टॉवर्स, सातारा.
पृष्ठे : 100.
अनुभव
शोधाशोध या विशेष लेखमालेत जातींच्या जोखडात : दीप्ती राऊत, कॅन्सर समजून घेताना : अनिल अवचट, कॉंग्रेस : पिछेहाटी-नंतरचे पेच : सुहास पळशीकर यांचे लेख वाचनीय आहेत. भारताचे मंगळयान पहिल्याच प्रयत्नात थेट मंगळाच्या कक्षेत कसे पोहोचले आणि त्यासाठी भारतीय तंत्रज्ञांनी - शास्त्रज्ञांनी संपूर्ण भारतीय बनावटीचे तंत्रज्ञान कसे निर्माण केले याचा वेध घेणारा "मंगल यश' हा मयूरेश प्रभुणे यांचा विशेष लेख, छायाचित्राद्वारे भग्न होत असलेल्या अजिंठ्याच्या प्राचीन चित्रांना नवे स्वरूप देणाऱ्या अवलिया छायाचित्रकाराचा मुक्ता चैतन्य यांनी करून दिलेला परिचय हे या अंकांचे वैशिष्ट्य ठरावे. मी शिष्य-मी गुरू: या लेखाद्वारे आरती अंकलीकर यांनी आपला गान आणि विद्यादानाचा प्रवास उलगडून दाखवला आहे तर भ्रष्टाचाराशी लढणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकारी सदानंद दाते यांनी मला उमगलेलं माझ्यापुरतं सत्य या लेखात आपल्या एकाकी वाटचालीचे कथन केले आहे. डॉ. आनंद नाडकर्णी यांनी दुबई : आता कशाला उद्याची बात, या लेखाद्वारे दुबईचा भुलभुलैय्या वाचकांना समजावून दिला आहे. 1888 मध्ये चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉग याने काढलेले निसर्ग चित्र पहिल्या पानावर आहे तर या थोर चित्रकाराचा परिचय वसंत आबाजी डहाके यांनी करून दिला आहे. अत्यंत सुरेख मांडणी आणि सजावटीने हा अंक वाचनीय झाला आहे.
अनुभव
प्रकाशक : युनिक फिचर्स,
8, अमित कॉम्प्लेक्स,
474, सदाशिव पेठ,
टिळक रोड, पुणे : 30
पृष्ठे : 186, किंमत : 120 रुपये.
साहित्य चपराक
साप्ताहिक साहित्य चपराकचा या वर्षीचा दिवाळी अंक कथा, विशेष लेख, कविता आणि वैचारिक लेखांनी वाचनीय झाला आहे. बाबासाहेब पुरंदरे : कथा शिवचरित्र कथनाची, उमेश सणस : मराठी कादंबरीची कथा आणि व्यथा, रामनाथ चव्हाण : भटक्या विमुक्तांचे सामाजिक, शैक्षणिक जीवन व समस्या, प्रशांत चव्हाण : माळीणच्या वाटेवर हे लेख वाचनीय आहेत. इस्लामची मूलतत्त्वे या प्रदीर्घ लेखात मुस्लीम धर्म आणि साहित्याचे व्यासंगी अभ्यासक शेषराव मोरे यांनी मुस्लीम धर्म आणि साहित्यातल्या विविध परंपरांचा मागोवा घेत, मुस्लीम धर्माचे खरे स्वरूप वाचकासमोर निर्भीडपणे मांडले आहे.
शरद पवार : प्रदीर्घ काळातील काही निरीक्षणे हा अरुण खोरे यांचा लेख पवारांच्या राजकीय प्रवासावर प्रकाशझोत टाकणारा आहे.
साहित्य चपराक
संपादक : घनश्याम पाटील.
प्रकाशक : चपराक प्रकाशन
617, साईकृपा, पहिला मजला,
शिवाजी रस्ता, शुक्रवार पेठ, पुणे.
पृष्ठे : 200, किंमत : 130 रुपये.
साधना : बालकुमार
साधनाच्या बालकुमार दिवाळी अंकात कोसळलेल्या बसमधला माणूस : अनिल अवचट, तीन मुली आणि एक कुत्रा : दमन सिंग, शाळेतले दिवस : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, एक संस्मरणिय मोहीम : जयंत नारळीकर यांचे बालकुमारांसाठी वाचनीय लेख आहेत. बालकुमार अंक हे साधनाचे वैशिष्ट्य. सुरेख रेखाटनांनी हा अंक अधिकच सुरेख झाला आहे.
साधना युवा दिवाळी अंक
मनमोहन सिंग यांच्या तीन मुली : दमन सिंग, अल्ला-उद्दीनचा दिवा : कुमार केतकर, माझ्या आठवणीतले न्यूयॉर्क : अच्युत गोडबोले, एका सेक्युलर कॉलेजची गोष्ट : चिन्मय दामले, "फ्रॅंड्री' आधीचा मी : नागराज मंजुळे यांचे लेख या दिवाळी अंकाचे वैशिष्ट्य आहे. या जीवनाचं काय करू? या लेखात अभय बंग यांनी दिशाहीन असलेल्या युवकांना प्रकाशाच्या दिशेने जाणारे मार्ग आहेत आणि परिवर्तन युवकांनीच घडवायला हवं, असा सुसंवाद युवकांशी साधला आहे. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या पत्नी डॉ. शैला दाभोलकर यांनी आपल्या संसारिक जीवनाचा पट आणि वाट सापडली या लेखाद्वारे उलगडून दाखवली आहे.
संपादक : विनोद शिरसाठ
प्रकाशक : साधना साप्ताहिक,
926, सदाशिव पेठ,
पुणे 411 030
युवा साधना दिवाळी अंक
पृष्ठे : 58, किंमत 40 रुपये.
साधना बालकुमार दिवाळी अंक
पृष्ठे 34, किंमत 25 रुपये.
No comments:
Post a Comment