Monday, November 23, 2015

स्वागत दिवाळी अंकांचे 7

साहित्य
SCAN-141030-0005साहित्य हा दिवाळी अंक आपल्या नावाप्रमाणेच भरगच्च मजकुराने भरलेला आहे. वै-याची रात्र (के. ज. पुरोहित), पाषाण (रेखा बैजल), जगणा-या मोहाचे आख्यान (नीलिमा भावे), आपली माणसं (उषा तांबे), विसर्जन (विजय खाडिलकर), तानी (म. वि. कोल्हटकर), पराभूत (गुरुनाथ तेंडुलकर) आदी कथा वाचनीय आहेत. मुलाखत या विशेष सदरामध्ये प्रतिभाशाली अभिनेत्री मृणाल कुलकर्णी विषयी लेख आहे. मृणाल कुलकर्णी यांनी नुकताच ‘रमा माधव’ हा ऐतिहासिक चित्रपट दिग्दर्शित केला. चतुरस्त्र अभिनेता सुबोध भावे याच्याविषयीची मुलाखत ही वाचनीय झाली आहे. अमोल बावडेकर या कलाकारानेही मराठी मालिका, चित्रपटात स्वत:चे आगळे स्थान निर्माण केले आहे. संगीत नाटक आणि वैविध्यपूर्ण अभिनयशैलीच्या जोरावर मराठी नाटक, चित्रपट, मालिकांमधून स्वत:चा वेगळा ठसा निर्माण करण्यात अमोल यशस्वी ठरला आहे, ‘श्रद्धांजली’ या सदरात शंकर वैद्य यांना अरुण म्हात्रे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. वैद्य सरांना मोठया विषयांचे आकर्षण नव्हते. कविता शिरताना ती मुंगीसारखी छोटया बिळातून घुसते आणि हळूहळू अख्खा बुंधा व्यापून टाकते असंच सराचं मत असावं. साधेपणा ही सरांची वैशिष्टय असले तरी त्यात एक ग्रेस होती. कवी म्हणून आपलं कवीपणा पुन्हा पुन्हा तपासणारा दुसरा कवी माझ्या पाहण्यात नाही. ते स्वत:लाच प्रश्न विचारीत. कवी आणि कवितांवर प्रेम हे त्यांचे मिशन होते. आयुष्याची समग्रता कवितेत उतरली पाहिजे हा मंत्र सरांनी आम्हाला दिला असे मत या लेखात अरुण म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे.
या अंकात शिरीष पै, किशोर पाठक, उषा मेहता, भीमसेन देठे, महेश केळुसकर आदींच्या कविता वाचायला मिळतात. ‘गावचा रानमेवा’- अशोक बेंडखळे, गणपतीची शाळा- रश्मी कशेळकर, वयात काय आहे? सुधीर सुखटणकर आदी ललित लेख आहेत.
संपादक : अशोक बेंडखळे
पृष्ठे : १६८, मूल्य : १०० रुपये

SCAN-141030-0012उद्याचा मराठवाडा (संवादपर्व २०१४)
‘लोकशाहीतील माध्यमांची भूमिका’ याविषयी उहापोह करणारा दिशादर्शक लेखसंवाद या अंकाचे ठळक वैशिष्टय आहे. प्रकाश बाळ, प्रवीण बर्दापूरकर, सुरेश द्वादशीवार, राही भिडे, जयदेव डोळे, संजय आवटे, निशिकांत भालेराव, टेकचंद सोनवणे, श्रीरंजन आवटे आणि अन्य मान्यवर या लेखसंवादात लिहिते झाले आहेत. शिवाय, ‘गाईड’विषयी विजय पाडळकर यांचा लेख, अमर हबीब, बब्रूवान रुद्रकंठवार व अन्यांच्या कथा, गुलजार यांच्या अनुवादित कवितांसह नामवंतांच्या कविता असे साहित्य या अंकात आहे.
संपादक : राम शेवडीकर
पृष्ठे : १७६, मूल्य – १२५ रुपये

साप्ताहिक युगांतर
SCAN-141030-0004साप्ताहिक युगांतरचा यंदाचा दिवाळी अंक हा नेहमीप्रमाणे विविध विषयांनी नटलेला आहे. ‘मोटारगाडया’ या अच्युत गोडबोले यांच्या लेखात मोटारगाडीच्या एकूणच संस्कृतीचा आढावा घेण्यात आला आहे. जातीअंताची लढाई, बाबासाहेबांनी केलेले धम्मचक्र परिवर्तन व त्याचा परिणाम याची चर्चा दत्ता भगत, अविनाश डोळस, बी. व्ही. जोंधळे आणि गोविंद पानसरे यांनी त्यांच्या लेखात केली आहे. शेतकरी आंदोलने व त्यांच्या परिणामाची चर्चा रमेश पाध्ये यांनी त्यांच्या लेखातून केली आहे. ‘छावणी हलते आहे’ या अर्जुन डांगळे यांच्या गाजलेल्या काव्यसंग्रहाची निर्मिती कथा सांगणारा ‘छावणी’ साकारतानाची गोष्ट हा लेख या अंकात आहे. संजीव खांडेकर यांनी ज्येष्ठ साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांच्यावर लिहिलेला लेख वाचकांना नक्की आवडेल. निशिकांत ठकार यांनी ‘साहित्य का हिन्दी मराठी अनुबंध’ या निबंध संग्रहात लिहिलेल्या ‘अरुण कोलटकर का स्मरण’ या लेखाचा प्रदीप नेरुरकर यांनी केलेला अनुवादित लेख यंदाच्या युगांतरमध्ये वाचायला मिळेल. ‘ब, बळीचा’ या राजन गवस यांच्या गाजलेल्या कादंबरीवर विस्तृत चर्चा करणारा लेख आसाराम लोमटे यांनी लिहिला आहे. यंदाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेले सतीश काळसेकर यांच्या ‘विलंबित’ या काव्यसंग्रहाची समीक्षा या अंकात आहे. हिंदीतील ज्येष्ठ कवी अशोक वाजपेयी यांच्या कवितांचे विश्लेषण करणारा लेख वसंत आबाजी डहाके यांनी लिहिला आहे. राजा शिरगुप्पे यांनी त्यांच्या लेखात राजन गवस व कृष्णात खोत या ज्येष्ठ-तरुण लेखकांच्या साहित्यातील समान सुत्रांची सांगड घातली आहे. याशिवाय चित्रा बेडेकर, जयदेव डोळे, जयप्रकाश सावंत, प्रतिमा जोशी, पंकज करूलकर, प्रा. रणधीर शिंदे, आनंद विंगकर आदींचे लेख व कथा या अकांत आहेत.
संपादक : डॉ. भालचंद्र कानगो
पृष्ठे : २५६, मूल्य : १०० रुपये

रणांगण
SCAN-141030-0002साहित्याबरोबरच राजकारण, समाजकारण, नाटक, सिनेमा ते संगीत अध्यात्मापर्यंत विविध विषयाना अनुसरून कथा, कविता, कादंबरी, मुलाखती, परिसंवादाबरोबरच विशेष लेखांची जोड देऊन मुलभूत विचारानी सजलेला ‘रणांगण’ हा दिवाळी अंक वाचकांच्या वैचारिक ज्ञानात मौलिक भर टाकणारा आहे. मनाला अस्वस्थ करणारी, अंतरी सलणारी गोष्ट लेखणी रुपाने प्रगट करण्यासाठी ‘बोचते काही मनाला जीवघेणे’ हा विषय रणांगणने देऊन विविध विषयांतून उलगडलेले मनाचे नानाविध कप्पे लेखकांच्या लेखनशैलीने वाचकांना निश्चितच लुभावणारे ठरणार आहेत. या अंकामध्ये ‘जनाबाई मी आणि भाऊ’ हा योजना शिवानंद यांचा लेख, ‘एकाकी योद्धा’ हा अलका मांडके यांचा लेख त्याचबरोबर राम पटवर्धन एक ऋषी हा अरुण म्हात्रे यांचा लेख तसेच कथा, परिसंवाद, मुंबईच्या लेकीमधून अंतरात सल साठवून बाहेरच्या जगात वावरताना ओठावर हसू आणून पोटासाठी कष्ट करणा-या स्त्रियांची अनेक रुपे आदी साहित्य जगण्याची नवी उमेद आणि वाचनाची प्रेरणा जागविणारे आहेत. या अंकातील कवितांचा अस्खलित नजराणाही या दीपोत्सवाची शान वाढवणारा आहे.
संपादक : डॉ. अविनाश गारगोटे
पृष्ठे : २१६, मूल्य : ११० रुपये

तारांगण
SCAN-141031-0003मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील माहितीचा खजिना तारांगण या दिवाळी अंकात आहे. ‘गोष्ट शशांकच्या जडणघडणीची’ या लेखामध्ये ‘होणार सून मी ह्या घरची’ मधील प्रमुख अभिनेता शशांक केतकर याची माहिती, ‘संवाद माई आणि मेघना’चा या विशेष लेखात सुकन्या मोने आणि प्राजक्ता माळी यांच्यातील संवाद, ‘एसआरकेच्या कारकिर्दीची ज्युबिली’ या लेखात सुपरस्टार अभिनेता शाहरुख खानच्या २५ वर्षातील अभिनय कारकीर्दीची माहिती आहे. ‘माझ्या आयुष्यातील नवदुर्गा’ या आदेश बांदेकर यांच्या लेखात आयुष्याला दिशा देणा-या महिलांविषयी त्यांनी विस्तृत लिहिलं आहे. रोहिणी हट्टंगडी, ‘तीन दशकांचा प्रशांत प्रवास’ हा प्रशांत दामले यांचा लेख, अमृता खानविलकर यांचे लेख वाचनीय आहेत. ‘दोस्ती : पडद्यावरचे मानवतेचे महाकाव्य’ या लेखात ‘दोस्ती’ या हिंदीतील अजरामर चित्रपटाचा उहापोह केला आहे. गीतकार गुरु ठाकूरविषयीचा विशेष लेखाबरोबरच, ‘कलाकार रांगोळी लेख’, ‘‘अविनाश-विश्वजीत ‘टॉप गिअर’मध्ये’’, ‘बीईंग वुमन!’ – प्रसाद ओक-पुष्कर श्रोत्री आदींचे लिखाण अंकात आहे.
संपादक : मंदार जोशी
पृष्ठ : १३०, किंमत : रु. १००/-

प्रिय मैत्रीण
SCAN-141031-0004कथा आणि कवितांबरोबर ‘रंग माझा वेगळा’ या ललित लेखांतून विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे वेगवेगळे छंद आणि सहसा लोकांना माहीत नसलेल्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वांच्या पैलूचा आढावा या विभागात घेण्यात आला आहे. यात स्वरलता लता मंगेशकर यांना फोटोग्राफीच्या आणि चित्रकलेच्या छंदाबद्दल, आशाताईंच्या रुचकर आणि चवदार स्वयंपाकाबद्दल, माजी मिस इंडिया आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्वरूप संपत यांनी विशेष मुलांसाठी करत असलेल्या उपक्रमाबद्दल माहिती मिळते. स्मिता जयकर यांची ओळख अभिनेत्री म्हणून असली तरी वैयक्तिक जीवनात अध्यात्माला वाहून घेतलेल्या जयकर यांची एक वेगळी ओळख पटते. तसंच निवेदिता सराफ, प्रा. प्रवीण दवणे, डॉ. सलील कुलकर्णी, कवी-लेखक चंद्रशेखर जोशी, डॉ. संदीप केळकर यांच्या आगळ्यावेगळ्या छंदाविषयी माहिती मिळते. वेगळाच ध्यास घेतलेल्या अनुताई प्रभूदेसाई, मेनन कुटुंबीय आणि प्राची दुबळे यांचा वेगळ्या वाटेवरील प्रवास इतर महिलांसाठी, मैत्रिणींसाठी प्रेरणादायी आणि उत्सुकता निर्माण करणारा आहे. त्याचबरोबर रेसिपी, रांगोळी, राशिभविष्य आणि व्यंगचित्रांची मेजवानीही सोबत आहेच.
संपादक : वर्षा सत्पाळकर
पृष्ठ : १६०, मू्ल्य : रु. १२०/-

आपला परम मित्र
SCAN-141031-0002दर्जेदार मजकूर देणा-या काही मोजक्या अनियतकालिकांमध्ये ‘आपला परम मित्र’चा समावेश होतो. लैंगिक भावभावनांची चिकित्सा हा अंकाचा मुख्य विषय आहे. ‘कामभावनेविषयीचा दृष्टिकोन : काल आणि आज’ हा या विशेषांकाचा मुख्य विषय आहे. अगदी शेकडो वर्षापासून साहित्य, शिल्पकला तसेच विविध माध्यमातून लोकांसमोर कामभावना प्रकट होत आली आहे. या कामभावनेची सगळयाच अंगांनी चिकित्सा करणारे लेख यात आहेत. वात्सायनाआधीचे कामशास्त्रासंबंधित आचार्य (प्रा. गिरीश जोशी), महर्षी वात्सायन आणि त्यांचे कामशास्त्र : एक परिचय (अतिथी संपादक मनोज आचार्य), लैंगिक मूल्यांचे अवमूल्यन : कारणे आणि विश्लेषण (प्रवीण पाटकर), आज शालेय स्तरावर सुयोग्य लैंगिक शिक्षण का जरुरीचे आहे? (डॉ. अशोक कोपर्डे) आणि संगणकीय अश्लील कामसाधना.काल नव्हतीच, आज बोकाळली आहे आणि उद्या? (प्रशांत तारे) यातून लैंगिक भावनेची भूत, वर्तमान आणि भविष्यकाळातील वाटचाल अधोरेखित केली आहे. कथा, अनुवादित कथा आहेतच पण त्याचबरोबर १९व्या, २० शतकातील पुण्यातील संगीत रंगभूमी (रामकृष्ण बाक्रे), सिनेमातले ‘किलोस्कर’ (बाबू मोशाय), आशाताईंवरील व्हर्सटॅलिटी : दाय नेम इज आशा हा सुनीता तारापुरे यांचा लेख, गिरीश कर्वे यांनी त्यांच्या सहकारी मित्राबद्दल लिहिलेला ‘अजब सिनेमा गजब माणसे’ हा लेख मनाला चटका लावून जाणारा आहे. कोकणातील लोकगीतांची परंपरा सचित्र स्वरूपात उलगडून दाखवली आहे रश्मी कशेलकर यांनी. विविध विषयांचा अंकांत समावेश करताना योग्य तो समतोल साधला आहे.
संपादक : माधव जोशी
पाने : १६२ , मूल्य : १००

No comments:

Post a Comment