लोकप्रभा
लोकांच्या नजरेत सुंदर आणि तरुण दिसणे ही
चित्रपटतारकांची गरज असते. तेच त्यांचे खरे भांडवल असते. त्यामुळे
प्लॅस्टिक सर्जरी करून लोकांच्या नजरेत स्थिरावणा-या चित्रपट कलाकार आणि
त्यांचे अनुकरण करणा-या त्यांच्या चाहत्यांबाबतची माहिती प्लॅस्टिक
सर्जरीसाठी असलेल्या ‘मेक टू ऑर्डर’मधील तज्ज्ञांच्या सहा लेखांतून मिळते.
‘एफएफ’ वाहिन्यांमधून लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या सात ‘आरजे’च्या आत्म
संवादातून त्यांचा लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन समजतो. सगळयांनाच आवडेल,
असा हा विषय आहे. त्याचबरोबर कोल्हापूरमधील चांदीनगरी हुपरी, मातृदेवता
लक्ष्मी आणि कोयना विद्युत प्रकल्पाच्या हीरक महोत्सवानिमित्ताने हे विशेष
लेख यात आहेत.
कार्यकारी संपादक : विनायक परब
पाने : १२४
किंमत : ४०
पाने : १२४
किंमत : ४०
चारचौघी
बाजाराचा, चालू परिस्थितीचा, वाचकांच्या
बदलत्या आवडी-निवडीचा आढावा घ्यायचा आणि मासिकाच्या मजकुरात बदल करायचा,
जेणेकरून मासिक सदैव वाचनीय होईल, हा फंडा ‘चारचौघी’ने आपल्या दिवाळी
अंकातही वापरला आहे. मात्र अंकाची सुरुवात होते ती कथांपासून. अंकाच्या
सुरुवातीलाच असलेल्या शुभा नाईक यांच्या ‘निरभ्र’ या कथेतून दोन महिलांच्या
नात्यांतील धागा उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पुढच्याच गुरुनाथ
तेंडुलकर यांच्या ‘बाईच्या जातीला’ या कथेतून चूल आणि मूल या भवताली
फिरणारी महिलांचीच कलुषित वैचारिक परंपरा समोर येते. मात्र खिळवून ठेवतो,
तो या अंकातील ‘स्वभावाला औषध आहे’ हा परिसंवाद! या परिसंवादाच्या
माध्यमातून मानवी स्वभावाचे अनेकविध कंगोरे उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला
आहे. यातील काही कंगोरे हे आपल्यालाच आपल्या स्वभावाची ओळख करून देणारे
असल्याने आपल्यालाही आपली नव्याने ओळख होते. ‘उद्याचं टेक्नोवर्ल्ड’मधून
जगभरातील ‘जगातील पहिले कचरा व कार्बनविरहित शहर’, स्वयंचलित कृत्रिम
हृदय’, ‘ओएलईडीचा वाढता वापर’, अंतराळातील पहिले हॉटेल’ आणि ‘ई-कागद’,
‘जगातील पहिले एचआयव्ही व्हॅक्सिन’ इत्यादी नवनव्या माहितीचा आढावा घेण्यात
आला आहे. सोबतच ‘व्लादिवस्तोक रशिया-काही गमतीशीय आठवणी’ हा अनुप्रिता
परांजपे यांचा दीर्घ लेख थेट आपल्याला रशियात नेतो. तर ‘कर्तृत्वाच्या
वाटेवरील प्रतिमा’मधून आपल्याला जागतिक चित्रपटांतीची सैर घडवून आणण्यात
आली आहे. ‘दिवाळी डेकोरेशन टिप्स’ आणि वार्षिक राशी भविष्यही अंकात देण्यात
आले आहे.
चारचौघी
संपादक : रोहिणी हट्टंगडी
पृष्ठे : २५७
मूल्य : १०० रुपये
संपादक : रोहिणी हट्टंगडी
पृष्ठे : २५७
मूल्य : १०० रुपये
दक्षता
‘सद्रक्षणाय खल् निग्रहणाय्’ असं म्हणत
नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणा-या महाराष्ट्र पोलिसांचे ‘दक्षता’
हे मासिक. या अंकात अपर पोलिस महासंचालक मीरा बोरवणकर (पुणे कारागृह) यांची
विशेष मुलाखत आहे. बोरवणकर यांच्या बालपणापासून पोलिस सेवेतील त्यांचे
आयुष्य उलगडणारी ही मुलाखत आजच्या तरुणींना निश्चितच ‘दक्षता’च्या
माध्यमातून मार्गदर्शक ठरेल. यंदाच्या दक्षता दिवाळी अंकाचे आणखी एक
वैशिष्टय म्हणजे दक्ष नागरिक आणि सुरक्षिततेची गुरुकिल्ली! सध्याच्या
वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांनी काय काळजी घ्यावी, याबाबत गुरुमंत्र
देण्याचा प्रयत्न ‘सामान्य माणूस व सर्वागीण सुरक्षा’ या विषयांतर्गत
करण्यात आला आहे. माजी पोलिस महासंचालक व्ही. के. सराफ यांच्या ‘सेफ
लिव्हिंग : प्रोटेक्शन विदाउट पोलिस’ या इंग्रजी पुस्तकातील निवडक
लेखांच्या अनुवादातून ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा, लहान मुलांची सुरक्षा,
वाहनचोरी, चोरी व दरोडय़ांबाबत नागरिकांनी कशा पद्धतीने जागरूक राहावे,
याबाबत निश्चितच मार्गदर्शन मिळेल. ‘सायबर सुरक्षा’ विभागांतर्गत
‘दक्षता’ने नागरिकांना दक्ष करण्याचा प्रयत्न केला आहे. एटीएम पीन व मेसेज,
ई-मेल स्पुफिंग, बनावट एटीएम सेंटर, सोशल नेटवर्किंगवर येणा-या अनोळखी
फ्रेंड रिक्वेस्ट्स, फेसबुकवरून होणारी बदनामी, मोबाइल हॅकिंग, क्रेडिट
कार्डमधील फ्रॉड, ई-मेलद्वारे ऑनलाइन लॉटरीचे आमिष दाखवून होणारी फसवणूक,
अश्लील व्हीडिओ आणि छायाचित्रांच्या साह्याने संकेतस्थळावर होणारे
गैरप्रकार, मोबाइलची सुरक्षा आदींबाबत ‘सायबर सुरक्षा’ अंतर्गत छापलेले लेख
तरुणाईला सायबर क्राइमपासून दक्ष राहण्याकरता मार्गदर्शक ठरू शकतील, असे
आहेत. याचबरोबर कथा, कवितांचीही मेजवानी, खाऊगल्लीच्या सफरीसह
दिवाळीसाठीच्या रेसिपीज् आणि करिअर मंत्रही मार्गदर्शक आहेत.
सरसंपादक : डॉ. रश्मी करंदीकर (पोलिस उपायुक्त, ठाणे)
पाने : २१०
किंमत : ७० रु.
पाने : २१०
किंमत : ७० रु.
मुक्त शब्द
सातत्याने दर्जेदार साहित्य देणा-या
दिवाळी अंकांमध्ये ‘शब्द’ने गेली काही वर्षे आपले स्थान कायम राखले आहे.
यंदाही वाचकांची निराशा होणार नाही याची दक्षता संपादक मंडळाने घेतली आहे.
शांताल अॅकरमन या बेल्जियन ज्युईश दिग्दर्शिकेचा, तिच्या वेगळ्या
चित्रपटांचा संध्या गोखले यांनी करून दिलेला परिचय हा पहिलाच लेख त्याची
खूण पटवतो. पॅलेस्टिनी कवींच्या कविता, अनिल अवचटांच्या गावांविषयीच्या
आठवणी, कपिल पाटील यांचा मोदींविषयीचा लेख, सानिया, वंदना भागवत, प्रतिमा
जोशी, कृष्णात खोत, मनस्विनी लता रवींद्र, आसाराम लोमटे, मिलिंद बोकील,
जयंत पवार यांच्या कथा या सा-यांनीच अंकाचं पानंपान वाचनीय या विभागात नेऊन
ठेवलंय. माझ्या आयुष्यातील घोडचूक हा अत्यंत अल्प प्रतिसाद मिळालेला आणि
सर्वात वाचनीय असा दोन लेखांचा विभाग, ‘ती’च्या कविता, मी आणि माझा
काळमध्ये लिहिते झालेले नामवंत आणि ख्यातनाम साहित्यिकांच्या अनुवादित कथा,
मिलिंद बोकील यांना बोलते करणारी अंजली जोशी यांनी घेतलेली मुलाखत या
सगळ्याचा शब्द न् शब्द वाचनीय आहे.
मुखपृष्ठाचे ख्यातनाम चित्रकार प्रभाकर कोलते यांनी केलेले रसग्रहण आणि उत्कृष्ट छपाई यांचाही उल्लेख टाळता येणार नाही.
संपादक : यशोधन (येशू) पाटील
पृष्ठे : २४८
मूल्य : १८० रुपये
पृष्ठे : २४८
मूल्य : १८० रुपये
No comments:
Post a Comment