Monday, November 23, 2015

स्वागत दिवाळी अंकांचे 10

वेगळ्या विषयावरचा दामिनी
SCAN-141108-0005दामिनी या दिवाळी विशेषांकांत या वर्षी भुलभुलैया झटपट श्रीमंतीचा अशी टॅगलाईन आहे. मात्र या दिवाळी अंकात आर्थिक गणित वा झटपट श्रीमंत होण्याचे मार्ग नसून भारतात झालेल्या काही घोटाळ्यांचा व एकंदरीतच अवैध मार्गाने पैसा कमावण्याच्या मानसिकतेचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. भारत घोटाळेरत हा या अंकातला पहिला लेख असून यात गेल्या काही वर्षात झालेल्या कथित घोटाळ्यांचा वेध घेण्यात आला आहे. मात्र ही घोटाळ्यांची केवळ माहिती आहे. त्यामागच्या काही रंजक गोष्टी या घोटाळ्यांच्या विरोधातल्या आंदोलनांचा वगैरे यात वेध घेण्यात आलेला नाही. हा लेख जरी या दिवाळी अंकाचा मुख्य लेख असला तरी तो फारच त्रोटक स्वरूपात समोर येतो. दिलीप ठाकूर यांनी चित्रपटसृष्टीतल्या आर्थिक व्यवहारांवर लिहिलेल्या लेखात अनेक रंजक किस्सेही देण्यात आलेले आहेत. याशिवाय इतर लेख व कथा कविता या दिवाळी अंकात आहेत. नितीन पवार यांची सरान ही कथा मात्र त्याच्या नव्या फॉर्ममुळे अगदी आश्वासक अशी झालेली आहे. मुखपृष्ठावर दाखवण्यात आलेलं कृष्णविवर व त्यामध्ये असलेला पैसा हे सूचक आहे.
संपादक : शीतल करदेकर
पृष्ठे : ८२, मूल्य : ६०

अक्षरसिद्धी
SCAN-141108-0007बदलत्या जगाबरोबरच, बदलती माणसे, बदलत्या परंपरांचा विचार करता सुसंवाद, वाचनसंस्कृती कुठेतरी हरवत चालल्याचे निदर्शनास येते. मात्र दिवाळी अंकांच्या माध्यमातून हीच वाचनसंस्कृती ‘अक्षरसिद्धी’ दिवाळी अंकाच्या माध्यमातून जोपासली गेलेली दिसून येते. विवेकदीप, बांबूची महती, भारतीयत्वाचा अभिमान, जलप्रदूषण, म्हातारपणीच्या काठीचा बदलता विचार, मुक्त छंदातला मुक्त बाप आदी नव्या विचारांबरोबरच काव्योत्सवातून केली गेलेली शब्दांची उधळणही वाचकांना रममाण करणारी आहे.
सकारात्मक विचारांनी वाचकांना गुंगवून ठेवताना थोडक्यात पण महत्त्वाचे असे लेख अक्षरसिद्धीचे वेगळेपण जपणारे ठरतात. काव्य जगतातील चारोळ्या तसेच सूर्यास्त, जाते, जीवन एक संघर्ष आदी कवितांतून नात्यांबरोबरच संस्कृतीचा घेतलेला वेधही विशेष लक्षणीय ठरतो. दिवाळीच्या झगमगत्या दुनियेबरोबरच नवीन विचारांना दिलेली संधी ‘अक्षरसिद्धी’ दिवाळी अंकातून निश्चितच प्रभावी ठरणारी आहे.
संपादक : सुभाष कुदळे
पृष्ठे : ४४, मूल्य : ५१ रुपये

विश्वकर्मा पंचाल
SCAN-141108-0004आपली संस्कृती, संस्कारांचे शिंपण, परोपकार, विधी, शिक्षणाचा आढावा, सामाजिक संघटन, आरोग्य आणि स्त्रीशक्तीबरोबरच विविध तीर्थक्षेत्रांचा वेध घेऊन साकारलेला ‘विश्वकर्मा पंचाल’ हा दिवाळी अंक विविध विषय, विचार आणि मतांच्या जडणघडणीतून ख-या अर्थाने पूर्णत्वास गेला आहे. वाचकांना या अंकातून परिपूर्ण माहिती देण्याचा मानस खरोखरच वाखाणण्याजोगा आहे.
या दिवाळी अंकातून रूढी परंपरा, युवा मंच एक जागर, आईवडील महान दैवत, आरोग्यम् धनसंपदा, श्रद्धा-अंधश्रद्धा, बालसंस्कार, मुली जगवा जीव वाचवा, स्त्रीशक्तीला सलाम आदी लेखांतून जोपासली गेलेली विचारधारा वाचकांना प्रभावित करणारी आहे. लेखकांनी आपल्या दर्जेदार लिखाणातून संस्कृती जोपासण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. आजच्या बदलत्या जीवनात मंगलविधींची यथोचित माहिती करून देणारा ‘समाजातील रूढी परंपरा एक चिंतन’ हा समाजभूषण शांताराम सागवेकर यांचा लेख आजच्या पिढीसाठी विशेष मार्गदर्शनपर आहे. नवीन विचारधारा, आध्यात्माबरोबरच संस्कृती आणि संस्कारावर दृष्टिक्षेप टाकून वाचकांना वाचनाचा आनंद देणारा विश्वकर्मा दिवाळी अंक आपलं वैशिष्टय ठळकपणे उमटवतो.
मुख्य संपादक : जयवंत देवरुखकर, संपादक : सुनील देवरुखकर
पृष्ठ : २००, मूल्य : २ रुपये

तरुण
SCAN-141108-0009‘तरुण’चा यंदाचा ४०वा दिवाळी अंक खुमासदार कथा, कविता यांनी भरलेला आहे. अंकाच्या सुरुवातीलाच माजी खासदार मनोहर जोशी यांनी विक्रमराव सावरकर यांच्याबद्दलच्या आठवणी जागवणारा लेख लिहिला आहे. स्वातंत्र्यवीर दि. विनायक दामोदर सावरकर यांच्या सूनबाई श्रीमती सुंदरताई विश्वास सावरकर यांची स्वातंत्र्यवीरांच्या आठवणीबद्दल अमेय गुप्ते यांनी घेतलेली मुलाखत या अंकाचे खास वैशिष्टय आहे. त्यानंतर ‘तरुण’ या दिवाळी अंकाची चाळीस वर्षाची वाटचाल संपादक सच्चिदानंद महाडिक यांनी त्यांच्या लेखातून सांगितली आहे.
या अंकात विश्वास (नि. श. गुळवणी), मंगलोरी कौलं ( अनिल जावकर), निळ्या आभाळाच्या छायेत (भालचंद्र गंद्रे), दिन दिन दिवाळी (स्मिता पाटील), हरिणीचे लग्न(जयंत रानडे), पायाचे दगड गोटे (करुणा म्हात्रे), तथास्तु (जयवंत कोरगांवकर) आदी कथा आहेत. याशिवाय पद्माकर सोमणे, जमील शेख, अशोक कुमावत, नंदकुमार मालाडकर, रमाकांत सामंत, संजय सागरे चारूलता कुलकर्णी, पल्लवी सरलष्कर-अष्टेकर, आशा गोडाड यांच्या कथाही या अंकात आहेत. याशिवाय रवींद्र कोरे, उमाकांत कामत, दत्ता सावंत, सुवर्णा जाधव, रमेशकुमार मेंगळे यांच्या कविता या अंकात आहेत.
संपादक : सच्चिदानंद महाडिक
पाने : १६०, मूल्य : ८० रुपये

महिलांची चळवळ मुक्ता
SCAN-141108-0008समाज, राजकारणातच नव्हे तर अगदी घराघरात स्त्रियांना मिळणारी वागणूक, तिला मिळणारे स्थान, दिल्या जाणा-या संधी आदी गोष्टींचा विचार करता पुरुषी मानसिकता बदलण्याची असलेली गरज हा विचार आपसूकच ‘महिलांची चळवळ मुक्ता’ या दिवाळी विशेषांकातून उमटताना दिसतो. कर्तृत्वशालिनी या विशेष लेखातून सिंधुताई सपकाळ, सुलोचना चव्हाण, माणदेशी महिला बँक, मुक्ता बर्वे आदींनी आपल्या आयुष्यातील प्रवासातून उभे केलेले जिवंत प्रसंग, जीवनातील संघर्ष, जबाबदा-या यशाचा गुरुमंत्र देतात. या विशेषांकामध्ये परिसंवाद, राजकारण काल आणि आज, वलयांकितमध्ये मोहन जोशी आणि राहुल सोलापूरकर यांचे अनुभव, का वाढतेय असहिष्णुता आदी लेखांतून वैचारिक गाभा परिपूर्ण जपला गेला आहे. तर अंकाच्या मुखपृष्ठातून उमटणा-या वास्तवाचा घेतलेला वेधही स्त्रीमुक्तीच्या पार्श्वभूमीवर समर्पक ठरतो. ‘महिलांची चळवळ मुक्ता’ हा अंक वाचनीय आहे. विविध विषयांचं मर्म जोपासण्याचा या अंकातून चांगला प्रयत्न करण्यात आला आहे.
संपादिका : शोभना देशमुख
पृष्ठे : ६४, मूल्य : ७० रुपये

साहित्य संगम
मयुरेश प्रकाशनच्या ‘साहित्य संगम’ या दिवाळी अंकात दरवर्षीप्रमाणे लेख, कथा कविता, विशेष परिसंवाद असा साहित्यिक फराळ आहे.
SCAN-141108-0006यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकींमध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर केंद्रात भाजपची सत्ता आली. याचा आढावा घेणारा डी. डी. गोखले यांचा लेख ‘हा चमत्कार कसा घडला’ वाचनीय आहे. २००९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुका आणि २०१४च्या निवडणुका यांचे विश्लेषण या लेखात करण्यात आले आहे. १९९८पासून मेळघाटमधील आदिवासींसाठी आरोग्याचे वरदान देणारे डॉ. आशीष सातव यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सांगणारा ‘मेळघाटातील धन्वंतरी’ हा लेख ललिता त्रलोक्य यांनी लिहिला आहे. पाकिस्तान व चीन हे देश सीमेजवळ भारताशी छुपे युद्ध किंवा शीतयुद्ध करीत असतात. या एकूणच परिस्थितीचा व या देशांच्या हालचाली व पुढील काळातील भारतापुढील आव्हाने याचा परामर्श घेणारा ‘पाकिस्तान, चीनचे भारताशी अपारंपरिक युद्ध’ हा लेख ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी लिहिला आहे. वसई विरार शहर महापालिकेच्या उपायुक्त संगीता धायगुडे यांनी अध्यात्म आत्मसात केल्यानंतर त्यांच्या विचार जाणिवांना कशा प्रकारे वेगळी झळाळी प्राप्त झाली हे ‘अध्यात्म’ या लेखातून सांगितले आहे.
याशिवाय दूरदर्शनचा पहिला जादूगार’ (शशिकांत काळे), लोकलची चौथी सीट (उमाकांत वाघ), पायगुण (मीनाक्षी अय्यंगार) यांचे लेखही अंकात आहेत. अभय गोखले यांनी घेतलेली अभिनेते रमेश देव यांची मुलाखतही वाचकांना नक्की आवडेल.
संपादक : उमाकांत वाघ
पाने : १०८, मूल्य : ७० रुपये

No comments:

Post a Comment