श्रावणी
दर्जेदार
कथा, मन लुभावणा-या कविता, त्यातील नात्यांचा ओघ, वैचारिक लेखांतून केलं
गेलेलं नात्यांचं शिंपण आणि स्वाद-आस्वादाबरोबरच कथांना अनुरूप अशा
साकारलेल्या रेखाचित्रांनी या वर्षीचा ‘श्रावणी’ दिवाळी अंक अगदी परिपूर्ण
बनला आहे. या अंकातील श्रीकांत आंब्रे यांची कविता वास्तवाचा वेध घेऊन
वाचनाचा स्वाद देणारी आहे. मराठी चित्रपट ‘कधी फंडा, कधी थंडा’ मधून दिलीप
ठाकूर यांनी सिनेमा जगताचा घेतलेला वेधही वाचनीयच आहे. रमा माधव, चिंतामणी,
कुटुंब, राखणदार आदी चित्रपटांच्या माध्यमातून सिने क्षेत्रातील अनेक
किस्से त्यांनी उलगडवले आहेत. गायक किशोर कुमार यांच्या यशस्वीतेवर प्रकाश
टाकणारा व त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा ‘किशोर कुमार – आराधना आधीचा
व नंतरचा’ हा लेख वाचकांसाठी विशेष लक्षणीय आहे. ‘श्रावणी’ दिवाळी अंकाचं
हे पाचवं वर्ष आहे. दर्जेदार लेखकांच्या दर्जेदार कथा, कवितांची साकारलेली
रुपकं, उत्कृष्ठ मुखपृष्ठ आणि अंकातील रेखाचित्रांनी श्रावणी दिवाळी अंक
विशेष लक्षणीय ठरतो.
संपादिका : सायली कदम, पृष्ठ : ११०, मूल्य : ८०
संपादिका : सायली कदम, पृष्ठ : ११०, मूल्य : ८०
अर्थविश्व
बँकिंग,
विमा आणि गुंतवणूक यांसारख्या विषयांना वाहिलेले लेख यंदाच्या दिवाळी
अंकामध्ये आहेत. अनेक मान्यवर अर्थतज्ज्ञांनी सर्वसामान्यांना समजेल अशी
वापरलेली भाषा हे या अंकाचे वैशिष्टय म्हणावे लागेल. डॉ. वसंत पटवर्धन
यांचा ‘राष्ट्रीयीकृत बँकांचा कायापालट’, डॉ. अनंत लाभसेटवार यांचा ‘भाववाढ
नको, भाववाढ पाहिजे’, शशिकांत जाधव यांचा ‘भारतीय बँकांची पुनर्बाधणी’,
राम सुब्रमणियम यांचा ‘अनिवासी भारतीयांची ठेव योजना’ या लेखांमुळे हा अंक
अधिक वाचनीय झाला आहे. याबरोबरच देवदत्त धानोरकर यांनी घेतलेली एलआयसी
नोमुरा म्युच्युअल फंडाचे सीईओ निलेश साठे यांची मुलाखत, ‘वयानुसार
गुंतवणूक कशी असावी?’, ‘सीनियर सिटिझन्स सेव्हिंग्ज स्कीम’, ‘अपारंपरिक
गुंतवणूक माध्यमे आणि त्यांचे निर्देशांक’, ‘आजची बचत, उद्याची वसुली’,
‘म्युच्युअल फंड’ यांसारख्या लेखांमुळे हा अंक माहितीपूर्ण झाला आहे. शिवाय
‘शेअर बाजार-जुगार? छे बुद्धिबळाचा डाव’ आणि मुंबई, पुणे आणि कोकण या
भागांमधील मालमत्ता खरेदीविषयक मार्गदर्शक लेखही यात आहेत. याबरोबरच
व्यंगचित्रांच्या माध्यमातून दैनंदिन आर्थिक बाबींवर मार्मिक भाष्यामुळे
अर्थविषयक अंक हलका-फुलका करण्याचा स्तुत्य प्रयत्न झाला आहे.
संपादक : रमेश नार्वेकर, पृष्ठ : ११६, मूल्य : ६०
संपादक : रमेश नार्वेकर, पृष्ठ : ११६, मूल्य : ६०
कोकणशक्ति
कोकणशक्ति
या साप्ताहिक वृत्तपत्राचा चोविसावा दिवाळी अंक खुमासदार कथा, कविता यांनी
भरलेला आहे. अंकाच्या सुरुवातीलाच मधु मंगेश कर्णिक यांची ‘समिधा’ ही कथा
आहे. स्वातंत्र्य सैनिक आप्पा भिडे यांच्या स्वातंत्र्यपूर्व काळात
मिळणा-या पेन्शनबाबतची कैफियत कर्णिक यांनी या कथेतून मांडली आहे. मनोहर
तळेकर यांची ‘शॉट कट ऑफ सर्जरी’ ही लघुकथा या अंकात आहे. रमेश राणे यांनी
लिहिलेली ‘अखेरचा दिवस’ ही मुंबई परिसरात घडलेली एक थरारक आणि विस्मयचकित
करणारी दर्जेदार रहस्यकथा हे या अंकाचे खास आकर्षण आहे. ‘आता क्रांती हवी
क्रांती’ या राजकीय लेखात कांताराम धानमेहेर यांनी मतदार राजाला मतदानाचे
महत्त्व सांगितले आहे. कोकणातील माणसांबद्दल सांगणारा ‘कोकणी माणूस’ हा लेख
रजनी रमाकांत वैद्य यांनी लिहिला आहे. ‘चक्रव्यूह’ ही बाळ राणे यांनी
लिहिलेली दीर्घकथा वाचकांना नक्कीच आवडेल. याशिवाय सूर्यकांत लक्ष्मण
सावंत, मोहन साटम, अरुण भालेराव या लेखकांच्या कथा या अंकात आहेत. तर
ज्योती राणे, स्नेहल सुहास शेवडे, ज्योतील गोसावी, मनोहर गोविंद तळेकर
यांच्या कविताही या अंकात आहेत. या अंकातील रमेश केणी यांच्या
वात्रटिका/कानपिचक्या वाचनीय आहेत. कोकणशक्तिच्या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ
मनोवेधक आहे.
संपादक : बाळासाहेब सनये, पृष्ठ : ११६
मूल्य : १००
संपादक : बाळासाहेब सनये, पृष्ठ : ११६
मूल्य : १००
कलामंच
‘कलामंच’
या दिवाळी अंकात सुरुवातीलाच संपादिका हेमांगी नेरकर यांनी ‘वेध
पुस्तकांचा’मध्ये डॉ. महेश केळुसकर यांच्या ‘झिनझिनाट’, अभिनेत्री स्पहा
जोशी यांच्या ‘लोपमुद्रा’ आणि ज्योती कपिले यांच्या ‘मनमुक्ता’ या कविता
संग्रहांचा ठाव घेतला आहे. चिं. त्र्यं. खानोलकर ऊर्फ आरती प्रभू यांच्या
साहित्य ठेव्याची यादीही अंकात समाविष्ट आहे. तसेच ‘विस्मृतीच्या माळेतील
स्मरणमणी : दीपमाळ’ या लेखात आरती प्रभूंच्या साहित्यातील योगदानाबाबत
अनुपम बेहेरे यांनी प्रकाश टाकला आहे. याशिवाय या अंकात आरती प्रभू, मंगेश
पाडगांवकर, प्रवीण दवणे, डॉ. महेश केळुसकर यांसह अनेक कवींच्या कवितांचा
अंतर्भाव करण्यात आला आहे. आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरच्या
आतापर्यंतच्या वाटचालीचा पट खुद्द सईच्या तोंडून उलगडण्यात आला आहे.
संपादिका : हेमांगी नेरकर, पृष्ठ संख्या : १७६
भूमी सम्राट
भूमी
सम्राट या दिवाळी अंकातून राजकीय, सामाजिक स्तरावरील वास्तवाचा वेध
घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भ्रष्टाचार, घोटाळे, गरिबी, श्रीमंती,
वाढलेली महागाई, स्त्रियांना देण्यात येणारी समाजातील वागणूक आदींचा वेध
घेऊन भूमी सम्राट या दिवाळी अंकातून अन्याय, अत्याचाराविरोधी आवाज
उठविण्याचा चांगला प्रयत्न करण्यात आला आहे. ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री
मधु मंगेश कर्णिक यांची ‘पारणे’ ही कथा पंढरपूरच्या विठूरायाच्या चरणी लीन
करणारी आहे. त्याचप्रमाणे ‘मन उदास उदास, दया मरण द्या’ हा मनोरुग्णांच्या
जीवनाची कहाणी सांगणारा लेख, बाळ राणे यांचा ‘माणुसकीचा मळा’ ही कथा, तसेच
पश्चाताप, स्त्री असे जगतजननी आदी दर्जेदार साहित्य वाचकांच्या काळजाचा ठाव
घेणारे आहे. एकंदरीतच वास्तवाचा वेध घेऊन दर्जेदार साहित्यिकांच्या
साहित्याला स्थान देऊन साकारलेले भूमी सम्राटचे हे रूप वाचकांना निश्चितच
पसंत पडेल याची खात्री वाटते.
संपादक : चंद्रकांत गोखले, पृष्ठे : ४८
मूल्य: ३०
मूल्य: ३०
No comments:
Post a Comment